जिभेवरचं नियंत्रण सुटल्यामुळेच माझं वाटोळं झालं, अजित पवारांची कबुली
By Admin | Updated: June 5, 2016 21:29 IST2016-06-05T21:29:32+5:302016-06-05T21:29:32+5:30
कमरेखालची भाषा केल्यामुळं आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्रिपद गमावणाऱ्या अजित पवारांनी कार्यकर्त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला
जिभेवरचं नियंत्रण सुटल्यामुळेच माझं वाटोळं झालं, अजित पवारांची कबुली
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 5- कमरेखालची भाषा केल्यामुळं आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्रिपद गमावणाऱ्या अजित पवारांनी कार्यकर्त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला आहे. सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. 'दुधानं तोंड पोळल्यामुळं ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळं जिभेवर नियंत्रण ठेवा आणि काळजीपूर्वक बोला', असा महत्त्वाचा सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.
सोपलांच्या भाषणाचा समाचार
आपलं बार्शीचं भाषण शिराळ्यात खूप गाजलं. महाराष्ट्रभर भाषण गाजलं. आपण कधी कधी लोक हसायला लागल्यानंतर, बोलणाऱ्यालाही वाटतं की, चला, लोक हसतायेत, तर अजून हसवावं. पण नंतर मग हसवता हसवता, त्यालाच रडायची पाळी येते, असे म्हणत अजित पवारांनी राष्ट्रवादीचे नेते दिलीप सोपल यांच्यावर निशाणा साधला. यावेळी अजित पवारांना खडसेंनी शेतकऱ्यांच्या मोबाईल बिलासंदर्भात केलेल्या वक्तव्याची आवर्जून आठवण झाली. दरम्यान अजितदादांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवरही टीका केली आहे.