अजित पवार यांना दुसऱ्यांदा धूळ चारली
By Admin | Updated: April 4, 2015 23:06 IST2015-04-04T23:06:10+5:302015-04-04T23:06:10+5:30
केंद्र व राज्यातील सत्ता गेल्यानंतर सहकारी कारखान्यांच्या निवडणुका लागल्या आहेत़ त्यामध्ये पहिली निवडणूक माळेगावची होती.

अजित पवार यांना दुसऱ्यांदा धूळ चारली
बारामती : केंद्र व राज्यातील सत्ता गेल्यानंतर सहकारी कारखान्यांच्या निवडणुका लागल्या आहेत़ त्यामध्ये पहिली निवडणूक माळेगावची होती. माळेगावचा निकालाने पवारांना कारखान्याच्या सत्तेपासून दूर ठेवले आहे. १९९७ च्या निवडणुकीत सर्व पवार विरोधकांना एकत्र करीत तावरे यांनी माळेगाव कारखान्याची सत्ता हस्तगत केली होती़ त्यानंतर आता दुसऱ्यांदा अजित पवार यांना त्यांनी धुळ चारली आहे़
अजित पवार यांच्या कार्यशैलीला सतत विरोध करणाऱ्या चंद्रराव तावरे यांनी १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला. माळेगाव ते बारामती अशी पदयात्रा काढत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले. जनमानसात चांगली प्रतिमा असलेल्या तावरे यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात आला. त्यांच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. अखेर तावरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. परंतु, १९९७ च्या निवडणुकीत सर्व पवार विरोधकांना एकत्र करून कारखान्याची सत्ता निर्विवादपणे हाती घेतली. अजित पवार यांच्या गटाला फक्त ३ जागा त्यावेळी मिळाल्या होत्या. पुढे २००२ च्या निवडणुकीत शरद पवार यांनी मध्यस्थी करून चंद्रराव तावरे - अजित पवार यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. कारखान्याची निवडणूक एकत्र घेऊन बिनविरोध केली. मात्र, त्यावेळी त्यांच्या चंद्रराव तावरे यांच्या समवेत असलेले रंजन तावरे यांनी विरोधकाची भूमिका कायम ठेवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना आपल्या अनुभवाच्या जोरावर ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ चंद्रराव तावरे यांनी चांगलाच झटका दिला आहे. अजित पवार ज्येष्ठांना चांगली वागणूक देत नाहीत, असा आरोप करीत यापूर्वी १९९७ साली माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चंद्रराव तावरे यांनी पवार यांच्या विरोधात लढविली. त्यावेळी देखील त्यांच्याबरोबर शेतकरी कृती समितीचे नेते रंजन तावरे होते. या निवडणुकीत अजित पवार यांच्या पॅनलला धुळ चारून ऐतिहासिक विजय मिळविला होता. माळेगावचा देखील खासगी कारखाना होईल. कर्जमुक्त कारखाना २००७ ला ताब्यात दिला होता. आज कोट्यावधी रुपयांच्या कर्जात डुबला आहे, असे सांगत त्यांनी प्रचारसभा घेतल्या. त्यांच्या आरोपांना प्रत्त्युत्तर देणे राष्ट्रवादीच्या नेत्यांना शक्य झाले नाही. अजित पवार यांनी तावरे यांच्यावर वैयक्तिक टिका करीत कारखाना कर्जमुक्त असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.
४२००७ च्या निवडणुकीत अजित पवार यांनी तावरे यांना प्रचार प्रमुख करून कारखान्याच्या राजकारणातून दूर केले. परंतु, तावरे यांना राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल जिंकून दिला. २००७ च्या निवडणुकीत रंजन तावरे यांच्या ७ जागा मिळाल्या होत्या. साडेसात वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत चंद्रराव तावरे, रंजन तावरे पुन्हा एकत्र आले. सुरुवातीपासून नियोजनबद्ध प्रचार केला. अजित पवार यांच्या खासगी कारखान्यांमुळे सहकार धोक्यात आला, असा प्रचाराचा सूर लावला. त्यात त्यांना यश आले. अजित पवार यांच्या नेतृत्वखालील पॅनलला दुसऱ्यांदा धूळ चारली.
निवडणूक अधिकारी भडकल्या
४बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी राणी ताटे यांनी पत्रकारांशी आज मतमोजणी केंद्रात उमर्टपणाची भाषा वापरली. त्याचबरोबर पत्रकारांकडे हातवारे करीत असभ्यपणाची भाषा वापरली. ताटे यांच्या या वर्तनामुळे उपस्थित सर्वच जण अवाक झाले. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांना ‘आता तुम्हाला मी दाखवतेच’ अशी भाषा वापरली.
... तरीही झाला नाही उपयोग
४कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर माळेगाव कारखान्यात विरोधकांचे आव्हान नसेल, असे चित्र होते. मात्र, चंद्रराव तावरे, रंजन तावरे या गुरूशिष्यांनी एकत्र येऊन माळेगावचे खासगीकरण रोखा, अशी सभासदांना हाक मारली. त्यात त्यांना यश आले. या उलट साडेसात वर्ष कारखान्याची सत्ता असून देखील राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलच्या उमेदवारांनी आपल्या निवडणुकीची सर्व भिस्त पक्षनेते अजित पवार यांच्यावरच ठेवली. पवार यांनाच प्रचारसभा घ्याव्या लागल्या. तळ ठोकावा लागला. मात्र, त्याचा सत्ता कायम ठेवण्यासाठी उपयोग झाला नाही. त्याचबरोबर नाराजी दूर करा, ज्यांना संधी मिळालेली नाही, त्यांना अन्य संस्थांवर संधी देऊ. तसेच, काहींना स्वीकृत संचालक केले जाईल, असे आश्वासन दिले. त्याचा उपयोग झाला नाही. माळेगावच्या सत्तेतून सभासदांनी राष्ट्रवादीच्या पॅनलला दूर केले.