Ajit Pawar on Eknath Shinde Help Kit: मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे लोकांना घर सोडून सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागला. या पुराच्या पाण्यात लोकांचा सगळा संसार उद्व्धस्त झाला. त्यामुळे राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु झालाय. दुसरीकडे या पूरग्रस्ताना देण्यात आलेल्या मदतीवरूनही राजकारण सुरु झालंय. पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो छापल्यामुळे वाद निर्माण झाला. यावरुनच विरोधकांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं.
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले आहेत. सरकारकडून सध्या पाहणी दौरे असून लोकांना तातडीने मदतीची अपेक्षा आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाकडून गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. मात्र पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे फोटो छापण्यात आल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला. एकनाथ शिंदे जाहिरातबाजी करण्यात व्यस्त असल्याचे विरोधकांनी म्हटलं. विरोधकांच्या या टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं.
"अडचणीत आलेल्या माणसाला मदत करणं हे आपलं पहिले सगळ्यांचे काम आहे. मदतीसाठी सरकार कामावर लागलेलं आहे. त्याचवेळी वेगवेगळ्या एनजीओ, वेगवेगळे राजकीय पक्ष ते त्यांच्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझं म्हणणं आहे की त्या बाबीला फार महत्त्व देण्यापेक्षा ज्याला गरज आहे त्याला मदत होते की नाही हे पहिलं बघितलं पाहिजे. माझी विनंती आहे की या गोष्टीचा बाऊ करु नका. अडचणीतल्या शेतकऱ्याला कसे उभं करता येईल याला महत्त्व दिलं पाहिजे," असं अजित पवार यांनी म्हटलं.
"विरोधकांना माझी विनंती आहे की तुम्हीही करा. तुमचे फोटो लावा.तुम्हाला जर तशी मदत करायची असेल तर करा. फोटो लावून करायची असेल तर करा किंवा न लावता करा. पण टीका करणं महत्त्वाचे आहे की मदत करणे महत्त्वाचे आहे. याचा माणुसकी म्हणून विचार झाला पाहिजे," असेही अजित पवार म्हणाले.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
"अशा काळात राजकारण करणं दुर्दैवी आहे. लोकांना मदत होणं गरजेचं आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना मदतीचं वाटप केलं. त्या बॅगमध्ये मदत काय आहे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बॅगवरील फोटोकडे कसलं लक्ष देता? आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी कधी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन एक किलो धान्य तरी दिलं आहे का?," असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.