बारामती : बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्यानंतर वित्त आणि नियोजन खात्याचा कार्यभार सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंत सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा बहुमान मिळविला आहे. बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी १३ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे, तर सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कारकिर्दीतील अकरावा अर्थसंकल्प सादर केला. बॅरिस्टर वानखेडे यांनी महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या काळात १९६०च्या दशकात हा मान मिळविला, तर पवार यांनी अलीकडील काळात २०११-१२ पासून हा मान मिळविला आहे.
अर्थसंकल्पासाठी आणखी चार वेळा मिळणार संधी
उपमुख्यमंत्री पवार यांनी सुरुवातीला २०११-१२, २०१२-१३, २०१३-१४ मध्ये २५ फेब्रुवारी आणि ५ जून रोजी दोन वेळा, २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३, २०२४-२५ मध्ये २७ फेब्रुवारी आणि २८ जून रोजी, तर २०२४-२५ तसेच नुकताच पवार यांनी २०२५-२६ चा ११वा अर्थसंकल्प सादर केला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांचा या सरकारमधील पहिलाच अर्थसंकल्प आहे. आणखी चार वेळा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी पवार यांना मिळणार असल्याचे उघड आहे. त्यामुळे १५ वेळा अर्थसंकल्प सादर करून सर्वांचेच रेकॉर्ड मोडण्याची संधी अजित पवारांकडे आहे.
सौनिक प्रेक्षक गॅलरीत
विधानसभेत अधिकाऱ्यांची गॅलरी ही खालीच असते. पत्रकार गॅलरी वर असते. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक मात्र अधिकाऱ्यांच्या गॅलरीऐवजी प्रेक्षक गॅलरीतून बजेट ऐकत होत्या.