अजय-शाहरूख पुन्हा परस्परांना भिडणार
By Admin | Updated: June 1, 2015 05:01 IST2015-06-01T05:01:21+5:302015-06-01T05:01:21+5:30
बॉलीवूड कलाकार अजय देवगण याने २०१६ व २०१७ दोन्ही वर्षांच्या दिपावलीत स्वत:चे चित्रपट रिलीज करण्यासाठी बुकींग केले आहे.

अजय-शाहरूख पुन्हा परस्परांना भिडणार
मुंबई : बॉलीवूड कलाकार अजय देवगण याने २०१६ व २०१७ दोन्ही वर्षांच्या दिपावलीत स्वत:चे चित्रपट रिलीज करण्यासाठी बुकींग केले आहे. यानिमित्ताने अजयने पुन्हा एकदा ‘किंग खान’ म्हणजेच शाहरुख खानला आव्हान दिले आहे. आतापर्यंत दिवाळीच्या काळात ‘किंग खान’चे चित्रपट प्रदर्शित होत असे.
‘शिवाय’ हा चित्रपट २०१६च्या दिवाळीत तर, २०१७मध्ये सन आॅफ सरदारचा सिक्वल रिलीज करण्याची घोषणा अजय देवगणने केली आहे. शाहरुख व अजय देवगण यांच्यातील ही स्पर्धा नवी नाही. अजयचा ‘सन आॅफ सरदार’ हा चित्रपट व शाहरुख खानचा ‘जब तक है जान’ (यशराज फिल्म्स) हा चित्रपट दिवाळीच्या कालावधीत एकाचवेळी प्रसिद्ध झाला होता. त्यावेळी शाहरुखने आपल्या चित्रपटाचे नुकसान केले, असा आरोप अजय देवगणने केला होता.
किंग खानचे कोणते चित्रपट येत्या दोन वर्षांत रिलीज होणार हे अद्याप नक्की नाही. शाहरुख सध्या तीन चित्रपट करत आहे. पहिला चित्रपट ‘दिलवाले’ असून अजयचा मित्र रोहित शेट्टी तो बनवत आहे. या चित्रपटात काजोल नायिका असून, ती अजयची पत्नी आहे. शाहरुख-काजोल ही बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी मानली जाते. त्याबरोबरच शाहरुखचा ‘दिलजले’ हा चित्रपट तयार होत असून , फॅन व रईस हे चित्रपटही रांगेत आहेत. फॅनची निर्मिती यशराजची असून शाहरुखने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केली आहे. हा चित्रपट येत्या आॅगस्टमध्ये रिलीज होणार होता. पण चित्रपटात व्हिएफएक्सचे बरेच काम बाकी आहे. त्यामुळे आता सप्टेंबरमध्ये बकरी ईदला रिलीज करण्यावर चर्चा सुरू आहे. शाहरुखचा तिसरा चित्रपट रईस असून , तो २०१६ साली ईदच्या मुहर्तावर रिलीज होणार आहे.
मात्र, आमचे चित्रपट निर्धारित तारखानाच रिलीज होणार, असे अजयचे समर्थक म्हणत आहेत. अजय दिवाळीत जे चित्रपट रिलीज करणार आहे, त्या चित्रपटांचे शूटिंग सुरू झालेले नाही. सन आॅफसरदारच्या सिक्वलसाठी कथाही निश्चित नाही.