ऐन दिवाळीतच व्यापाऱ्यांचा बंद?
By Admin | Updated: October 19, 2016 04:06 IST2016-10-19T04:06:18+5:302016-10-19T04:06:18+5:30
फेरिवाल्यांच्या विरोधात येथील व्यापारी आक्रमक झाल्याने पालिकेने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

ऐन दिवाळीतच व्यापाऱ्यांचा बंद?
ठाणे : रस्ता रुंदीकरणानंतरही स्टेशन परिसरात बस्तान मांडलेल्या फेरिवाल्यांच्या विरोधात येथील व्यापारी आक्रमक झाल्याने पालिकेने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, सोमवारी व्यापारी आणि येथील अनधिकृतपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांमध्ये बाचाबाची झाल्याने त्याचे पडसाद समस्त व्यापारी वर्गात उमटून सुमारे २०० दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली. त्यानंतर आता या व्यापाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर संजय मोरे यांची भेट घेऊन या फेरीवाल्यांवर अंकुश बसविण्याची मागणी केली.
या भेटीनंतर आता पालिकेने मंगळवारी सकाळपासून येथील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरु केली आहे. परंतु, येथील रिक्षा स्टँडवर अद्यापही कारवाई न झाल्याने व्यापाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र, तरीही दिवाळी आधी यावर ठोस उपाय योजना करावी अन्यथा दिवाळीनंतर या भागातील बंदचा इशारा या व्यापाऱ्यांनी दिला आहे.
रस्ता रु ंदीकरणासाठी मालकीची जागा देऊनही ठाणे महापालिकेने आपले आश्वासन पूर्ण न केल्याने या भागात फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढत असल्याची तक्रार येथील व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे केली होती. त्यानंतर याची दखल घेऊन आयुक्तांनी या भागात फेरीवाले बसू नयेत म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे, याशिवाय मुख्य रास्ता मोकळा ठेऊन त्यांच्या बाजूला ज्या गल्ल्या आहेत त्यामध्ये केवळ नोंदणीकृत फेरीवाल्यांना बसता येणार असल्याचेही सांगितले आहे. या रस्त्यावर बसणाऱ्या फेरिवाल्यांना हटवण्यासाठी सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत दोन गाड्या गस्त घालणार आहेत, असे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले होते. फेरीवाल्यांबरोबरच येथील अनिधकृत रिक्षा स्टँडदेखील हटवण्याचे आश्वासन दिले होते.
या आश्वासनानंतरही सोमवारी या भागात फेरीवाला आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष पेटला. फेरीवाल्याने, व्यापाऱ्याला धमकी दिल्याचे वृत्त वाऱ्यासारखे सर्व व्यापाऱ्यांमध्ये पसरले आणि येथील सुमारे २०० व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करुन या फेरीवाल्यांना कारवाईची मागणी केली. त्यानंतर रात्री उशिरा एका शिष्टमंडळाने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर संजय मोरे यांची देखील भेट घेऊन या फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी केली. याची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी तत्काळ आयुक्त संजीव जयस्वाल यांना दूरध्वनीद्वारे झाल्या प्रकाराची माहिती देऊन कारवाईची मागणी केल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>फेरीवाल्यांवर कारवाईच्या मागणीसाठी व्यापारी आक्रमक
आयुक्तांनी येत्या आठ ते दहा दिवसात या भागात बदल झालेले दिसतील, असे आश्वासन दिले. तसेच फेरिवाल्यांवरदेखील कारवाई केली जाईल असे सांगितले. त्यानुसार मंगळवारी सकाळपासून पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक या रस्त्यावर टेहाळणी करीत असून अनधिकृत फेरिवाल्यांवर कारवाई करीत होते. पालिकेने जरी ही कारवाई केली असली तरीदेखील येथील अनधिकृत रिक्षा स्टँडवर वाहतूक पोलिसांनी का कारवाई केली नाही, असा सवाल मात्र येथील व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.