आयआयटीमध्ये रंगणार एअर शो
By Admin | Updated: March 14, 2015 05:45 IST2015-03-14T05:45:10+5:302015-03-14T05:45:10+5:30
आशिया खंडातील सर्वांत मोठा एरोस्पेस महोत्सव अशी ओळख असलेला आयआयटी पवईचा ‘जेफायर’ महोत्सव शनिवार, १४ मार्चपासून सुरू होत आहे

आयआयटीमध्ये रंगणार एअर शो
मुंबई : आशिया खंडातील सर्वांत मोठा एरोस्पेस महोत्सव अशी ओळख असलेला आयआयटी पवईचा ‘जेफायर’ महोत्सव शनिवार, १४ मार्चपासून सुरू होत आहे. आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस इंजिनीअरिंग विभागाच्या एरोस्पेस इंजिनीअरिंग असोसिएशनने हा महोत्सव आयोजित केला असून, उपस्थितांना रविवार, १५ मार्च रोजी एअर शो पाहण्याची नामी संधी मिळणार आहे.
एरोस्पेस इंजिनीअरिंग विभागाच्या वतीने दरवर्षी जेफायर महोत्सव आयोजित करण्यात येतो. यंदा हा महोत्सव १४ आणि १५ मार्च रोजी आयआयटी पवई कॅम्पसमध्ये पार पडणार असून, यामध्ये देशभरातील ३०० महाविद्यालयांमधील ८ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या महोत्सवामध्ये प्रदर्शन, कार्यशाळा, चर्चासत्र, एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे. बोर्इंग आरसी प्लेस स्पर्धा १५ मार्च रोजी सकाळी ७ वाजता कॅम्पसमधील जिमखाना ग्राउंड येथे पार पडेल. या स्पर्धेत देशभरातून ६0 टीम सहभाग घेणार असून, विजेत्या संघास २.४ लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. १५ मार्चला सायंकाळी ४ ते ५ या वेळेत जिमखाना ग्राउंडवर एअर शो होईल. तसेच देशभरातील विद्यार्थ्यांनी एअरस्पेसविषयी केलेले प्रयोग प्रदर्शनामध्ये पाहण्यास मिळणार आहेत. इस्रोचे माजी संचालक प्रमोद काळे यांचे विशेष लेक्चर या वेळी होईल.