महाड एमआयडीसीत वायुगळती

By Admin | Updated: April 6, 2015 03:29 IST2015-04-06T03:29:33+5:302015-04-06T03:29:33+5:30

महाड एमआयडीसीमधील अ‍ेस्टेक लाइफ सायन्सेस बहेराम केमिकल्स प्रा. लिमिटेड या कंपनीत दुपारी १२ च्या सुमारास अचानक वायुगळती झाली

Air pollution in Mahad MIDC | महाड एमआयडीसीत वायुगळती

महाड एमआयडीसीत वायुगळती

बिरवाडी : महाड एमआयडीसीमधील अ‍ेस्टेक लाइफ सायन्सेस बहेराम केमिकल्स प्रा. लिमिटेड या कंपनीत दुपारी १२ च्या सुमारास अचानक वायुगळती झाली. वायुगळतीची माहिती देण्यास कंपनीने नकारघंटा वाजवली असली तरी बहेराम कंपनीच्या शेजारीच असलेल्या रेव्ही फॅन कंपनीमधील महिला कामगारवर्गाला मात्र या वायुगळतीचा सर्वात जास्त फटका बसला. ८० महिलांना वायुगळतीचा त्रास झाला असून त्यातील ८ महिलांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना महाड औद्योगिक वसाहत रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार चालू असल्याचे समजते. त्यात ज्योती तांबे, सुप्रिया वागारकर, वैशाली मालगुडे,
शारदा शिंदे, नंदा कदम, शिल्पा महाडीक, आशा तुरे या महिलांचा समावेश आहे.
पांढऱ्या रंगाच्या धुराचे लोट औद्योगिक वसाहत परिसरामध्ये सर्वत्र पसरल्याने अन्य कारखान्यातील कामगार या कंपनीच्या गेट बाहेर जमा झाले होते, मात्र कंपनी व्यवस्थापनाकडून वायुगळती झाल्याबाबत माहिती देण्यास नकार देण्यात आला. अर्ध्या तासानंतर हा प्रकार आटोक्यात आला, मात्र या ठिकाणावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आपल्या नाकावर रुमाल घेऊनच जावे लागत होते. या वायुगळतीमुळे श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होत होता, तसेच डोळ्यांच्या जळजळीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या ३ वर्षात अनेक वेळा या कंपनीमधून वायुगळतीचे प्रकार झाले असून महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या कंपनीला वायुप्रदूषणाबाबत नोटिसाही देण्यात आल्या आहेत. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईला न जुमानता या कारखान्याचा बेदरकारपणा सुरूच आहे. या घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनाकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. कोणत्या वायूची गळती झाली याबाबत कंपनी व्यवस्थापनाचे मौन कायम असल्याने या परिसरातील नागरिक व कामगारांच्या जीवावर टांगती तलवार कायम आहे. (वार्ताहर)

Web Title: Air pollution in Mahad MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.