एअर इंडियाचे दमदार जेतेपद
By Admin | Updated: March 3, 2017 05:30 IST2017-03-03T05:30:44+5:302017-03-03T05:30:44+5:30
एअर इंडिया संघाने तुल्यबळ महिंद्रा आणि महिंद्रा संघाचा ५२-३० असा पराभव करुन ९ व्या औद्योगिक राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली.

एअर इंडियाचे दमदार जेतेपद
मुंबई : बलाढ्य एअर इंडिया संघाने तुल्यबळ महिंद्रा आणि महिंद्रा संघाचा ५२-३० असा पराभव करुन ९ व्या औद्योगिक राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली. महिंद्रा संघाच्या आनंद पाटीलला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
या स्पर्धेची चार गटात विभागणी करण्यात आली होती. प्रत्येक गटातून दोन अशा एकूण आठ संघांनी बाद फेरी गाठली होती. अंतिम सामन्यात एअर इंडियाने आक्रमक खेळ केला. एअर इंडियाने अजय ठाकूर, राहूल चौधरी यांच्या आक्रमक चढायांच्या जोरावर मध्यांतराला २४-१३ अशी एकतर्फी आघाडी घेतली.
मध्यंतरानंतर महिंद्राने पिछाडी कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. आनंद पाटील, ओमकार जाधव, स्वप्निल शिंदे यांनी संघाचा पराभव टाळण्यासाठी अयशस्वी प्रयत्न केले. टी.विजयनच्या भक्कम पकडीमुंळे एअर इंडियाने महिंद्रा संघाला ५२-३० असे नमवले. उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकडी खेळाडू म्हणून अजय ठाकूर व टी. विजयन यांना गौरविण्यात आले. (क्रीडा प्रतिनिधी)