वातानुकूलित बसला मिडी बसचा पर्याय
By Admin | Updated: April 17, 2017 21:27 IST2017-04-17T21:27:51+5:302017-04-17T21:27:51+5:30
पांढरा हत्ती ठरलेल्या बेस्ट उपक्रमाने आजपासून वातानुकूलित बसगाड्या बंद केल्या.

वातानुकूलित बसला मिडी बसचा पर्याय
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - पांढरा हत्ती ठरलेल्या बेस्ट उपक्रमाने आजपासून वातानुकूलित बसगाड्या बंद केल्या. मात्र यास नागरिकांकडून विरोध होत असल्याने 50 वातानुकूलित बसगाड्या घेण्याचा प्रशासनाचा विचार आहे. विशेष म्हणजे मिडी बसचा प्रस्ताव यापूर्वी दोन वेळा बेस्ट समितीने नाकारला आहे. तरीही वातानुकूलित बसगाडीला पर्याय म्हणून मिडी बस घेण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीपुढे लवकरच मांडण्यात येणार आहे.
महापालिकेकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी बेस्ट उपक्रमाने आयुक्तांच्या आदेशानुसार कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार सर्वाधिक नुकसान करणारे वातानुकूलित बस मार्ग बंद करण्यात आले आहेत. मात्र वातानुकूलित बस मार्ग तुटीत असले तरी या बसगाड्यांमधून दररोज 18 ते 20 हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. ही सेवा ऐन उन्हाळ्यात बंद करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे वातानुकूलित बस गाडीला पर्याय म्हणून मिडी बस गाड्या आणण्याचा बेस्ट प्रशासनाचा प्रस्ताव होता.
मात्र या बसगाड्या म्हणजे खासगीकरणाचा डाव असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. वातानुकूलित बस मार्ग बंद केल्यामुळे प्रवाशांसाठी मिडी बस आणण्याचा प्रशासनाचा पुन्हा विचार सुरू आहे. किंग लॉन बसचा दर्जा अत्यंत सुमार असल्याने बस प्रवाशांनी या बससेवेकडे पाठ फिरविली. तसेच मुंबई व इतर परिसरात वातानुकूलित प्रवासाचे अनेक पर्याय निर्माण झाल्याने बेस्टची ही सेवा तोट्यात गेली, नियमित वातानुकूलित बस गाडीने जाणाऱ्या प्रवाशांसाठी मिडी वातानुकूलित बसगाड्यांचा पर्याय आणण्यात येत आहे.
स्वयंचलित दरवाजे असलेल्या या बसगाडीचे नियंत्रण संपूर्णपणे चालकाकडे असणार आहे. प्रवाशांना बस स्टॉपवर तिकिट खरेदी करुन या बसगाडीमध्ये चढता येईल. म्हणजे या बसगाडीमध्ये कंडक्टरची गरज पडणार नाही. एका बसगाडीची किंमत ४० ते ४५ लाख रुपये आहे. म्हणून या बसगाडीला विरोध होत आहे. वातानुकूलित बस गाड्या बंद करण्याची मागणी गेल्या चार वर्षांपासून बेस्ट समितीमध्ये करण्यात येत होती. मात्र त्यावेळेस सत्तेत असलेल्या शिवसेना व भाजपने याकडे दुर्लक्ष केल्यानेच बेस्ट वर ही वेळ आली आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. आर्यमन संपलेल्या ८०० बसगाड्या बेस्टमध्ये आहेत. या बसगाड्या टप्याटप्याने कमी केल्यानंतर बेसच्या सेवेवर त्याचा परिणाम होईल. म्हणून नवीन बसगाड्यांची ताफा सज्ज ठेवणे बेस्टला भाग आहे. २७ बस मार्गांवरील २६६ वातानुकूलित बस गाड्या सोमवारपासून बंद करण्यात आल्या आहे. या बस गाड्यांमुळे वार्षिक तीनशेहून अधिक कोटींचे नुकसान बेस्टला होत होते.