राज्यात १.६0 लाख हेक्टरवर चारा लागवडीचे उद्दिष्ट

By Admin | Updated: July 13, 2014 21:34 IST2014-07-13T20:06:41+5:302014-07-13T21:34:57+5:30

चारा टंचाईवर उपाय, २५ कोटी खर्च करणार, शेतकर्‍यांना पंधराशे रूपये अनुदान

Aim for the cultivation of fodder on 1.60 lakh hectare in the state | राज्यात १.६0 लाख हेक्टरवर चारा लागवडीचे उद्दिष्ट

राज्यात १.६0 लाख हेक्टरवर चारा लागवडीचे उद्दिष्ट

अकोला: पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे सतत निर्माण होणार्‍या चारा टंचाईचा सामना करण्यासाठी, राज्यात चारा गतीमान विकास कार्यक्रम राबविण्यात येणार असून, त्या अंतर्गत चालू खरीप हंगामात, राज्यातील एक लाख साठ हजार हेक्टर क्षेत्रावर चारा उत्पादन घेतले जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, चारा लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना बियाणे खरेदीसाठी पंधराशे रू पयाचे अनुदान दिले जाणार आहे. गत दहा वर्षात पावसाची अनिश्‍चितता वाढली असून, राज्याला सातत्याने अवर्षनाच्या स्थितीला सामोरे जावे लागत आहे. अवर्षनामुळे गुरांच्या वैरणाचा प्रश्न निर्माण होत आहे. दोन वर्षांपूर्वी पुरेशा पावसाअभावी राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह गुरांच्या चार्‍याचीही टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी विदर्भातील शेतकर्‍यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेला चारा मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रातील पशूपालक शेतकर्‍यांना पाठविला होता. दरम्यान, यावर्षीही पावसाने विलंब केला असून, राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचे संकेत हवामान विभागाने दिलेले आहे. त्यामुळे पुढच्यावर्षी चारा टंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता बघून, भाविष्यातील चारा टंचाईचा सामना करण्यासाठी कृषी विभागाने चारा गतीमान विकास कार्यक्र म हाती घेतला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हयात या कार्यक्रमातंर्गत चारा लागवड करण्यात येईल. चारा लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना शासनातर्फे बियाणे खरेदीसाठी पंधराशे रू पयाचे अनुदान दिले जाणार आहे. शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

** विविध जातींच्या गवताची शिफारस

उशीरा पेरणीसाठी रू चीरा फुले, अमृता, मालदांडी, फुले गोधन, तसेच पाण्याची उपलब्धता पाहून मका (आफ्रीकन टॉल), संकरीत नेपिअर, फुले जयंवत, किंवा मारवेल फुले गोवर्धन, या चारा पिकांची लागवड करावी, तर कुरण विकासासाठी फुले मारवेल, मद्रास, अंजन, काझरी-७५, डोगरी, प्यारा, गीनी, यशवंत, बलवंत हे गवत उपयुक्त आहे. पाऊस सुरू होताच शेतकर्‍यांनी या गवताची लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Web Title: Aim for the cultivation of fodder on 1.60 lakh hectare in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.