अहमदनगरमध्ये तिघांना जन्मठेप
By Admin | Updated: December 31, 2014 01:09 IST2014-12-31T01:09:00+5:302014-12-31T01:09:00+5:30
चार वर्षांपूर्वी झालेल्या येथील असीफ पटेल खून प्रकरणातील नऊपैकी तीन आरोपींना जन्मठेप व २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला़

अहमदनगरमध्ये तिघांना जन्मठेप
नेवासा (जि. अहमदनगर) : चार वर्षांपूर्वी झालेल्या येथील असीफ पटेल खून प्रकरणातील नऊपैकी तीन आरोपींना जन्मठेप व २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला़ तर पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली़
नेवासा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. शरद कुलकर्णी यांनी हा निकाल दिला़ सोपान ऊर्फ सोप्या भगवान गाढे (२२), धनू ऊर्फ धनंजय ऊर्फ गोविंद अशोक काळे (२२) व बिट्टू ऊर्फ अनिल चिमाजी लष्करे (३२) यांना जन्मठेपेसह २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला़
३१ आॅगस्ट २०११ रोजी ईद सणादरम्यान शहरात जातीय दंगल घडली होती. त्या वेळी हलीमाबी युसूफ पटेल यांचे गंगानगर भागातील घर जाळण्यात आले होते. घर जाळल्याची फिर्याद हलीमाबी पटेल यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला होता़
या तक्रारीचा राग धरून १३ सप्टेंबर २०११ रोजी खुपटी रोड परिसरात असिफ युसुफ पटेल (३८) यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला, अशी फिर्याद नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती़ नेवासा सत्र न्यायालय सुरू झाल्यानंतर पहिलीच जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. रवींद्र बबन काळे, संतोष जगन्नाथ पंडुरे, राजेंद्र कारभारी काळे, अंबादास लक्ष्मण धोत्रे, संजय लक्ष्मण सुकदान यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. (प्रतिनिधी)