कृषी विद्यापीठांची नोकर भरती लवकरच!
By Admin | Updated: November 12, 2014 23:33 IST2014-11-12T23:33:40+5:302014-11-12T23:33:40+5:30
निवड समिती अध्यक्षाच्या निवडीकडे विद्यापीठांचे लक्ष.

कृषी विद्यापीठांची नोकर भरती लवकरच!
अकोला: कृषी विद्यापीठांची रखडलेली नोकर भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, येत्या दोन आठवड्यात त्या संदर्भात आदेश निघणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. नोकर भरती निवड समितीच्या अध्यक्ष पदावर कुणाची वर्णी लागते, याकडे कृषी विद्यापीठांचे लक्ष लागले आहे.
गत वर्षी तत्कालीन राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठ नोकर भरती मंडळ स्थापन केले होते; तथापि ते कार्यरत न झाल्याने, कृषी विद्यापीठांची नोकर भरती प्रक्रिया रखडली आहे. याआधीही कृषी विद्यापीठ स्तरावर राबविण्यात येणार्या नोकर भरतीमध्ये अनेक अथडळे आले आहेत. या नोकर भरतीबाबतची काही प्रकरणे न्यायालयात गेल्याने मुख्यत्वे अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची नोकर भरती झाली नाही. परिणामी या कृषी विद्यापीठात तब्बल १,७५0 शास्त्रज्ञ, कर्मचार्यांचा अनुशेष आहे. त्यामुळे कृषी संशोधनावर परिणाम होत असून, मनुष्यबळाअभावी या कृषी विद्यापीठाची कृषी विज्ञान केंद्रे ओस पडली आहेत.
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, परभणी येथील स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि दापोली येथील डॉ. बाळासाहेब सांवत कृषी विद्यापीठ, या राज्यातील चार कृषी विद्यापीठांद्वारे महत्वाचे कृषी संशोधन केले जाते; तथापि अलिकडच्या दहा वर्षांत नोकर भरतीच झाली नसल्याने कृषी विद्यापीठांमधील शास्त्रज्ञ व कर्मचार्यांचा अनुशेष प्रचंड वाढला आहे. दरम्यान, या नोकर भरती प्रक्रियेसंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता असून, येत्या दोन आठवड्यात नोकरभरतीचे आदेश निघणार असल्याचे वृत्त आहे. यासाठीची तयारी कृषी विद्यपीठाने सुरू केली असून, शासनाच्या आदेशाकडे कृषी विद्यापीठाचे लक्ष लागले आहे.
येत्या दोन आठवड्यात नोकर भरती प्रक्रिया सुरू होणार असून, तसे आदेश लवकरच शासनाकडून विद्यापीठाला प्राप्त होण्याची शक्यता असल्याचे कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. व्ही. एम भाले यांनी सांगीतले.
*नोकर भरती मंडळाकडून, की कृषी विद्यापीठाकडून?
कृषी विद्यापीठाची नोकर भरती प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत असले तरी, पदे भरणार कोण, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. भरती कृषी विद्यापीठ नोकर भरती मंडळामार्फत होणार, की कृषी विद्यापीठांकडून, याबाबत अद्याप स्पष्ट संकेत प्राप्त झाले नसले तरी, हे अधिकार विद्यापीठांना मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
*कुलगुरू च राहील अध्यक्ष ?
सहयोगी प्राध्यापक पदापर्यंतचे नोकर भरतीचे अधिकार कृषी विद्यापीठांना मिळाल्यास, या निवड समितीच्या अध्यपदी कुलगुरूचीच वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.