दक्षिण कोरिया, मुंबई विद्यापीठात करार

By Admin | Updated: July 1, 2016 02:48 IST2016-07-01T02:48:31+5:302016-07-01T02:48:31+5:30

भारतातून दक्षिण कोरियात जास्त विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत नाहीत.

Agreement in South Korea, University of Mumbai | दक्षिण कोरिया, मुंबई विद्यापीठात करार

दक्षिण कोरिया, मुंबई विद्यापीठात करार

पूजा दामले,

मुंबई- भारतातून दक्षिण कोरियात जास्त विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत नाहीत. पण दक्षिण कोरियातील १० विद्यार्थी मुंबई विद्यापीठात, २५ विद्यार्थी पुणे विद्यापीठात आणि सिम्बॉयसिसमध्ये १० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण पुढच्या काळात विद्यार्थ्यांसाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. कोरियाच्या योन्से विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाशी एक करार केला आहे. नजीकच्या काळात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख कोरियात जाऊन एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार आहेत. त्यानंतर दोन्ही देशांत ‘स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम’ची सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती कौन्सिल जनरल साँग युन कीम यांनी ‘लोकमत’ला दिली.
भारत आणि दक्षिण कोरियाचे संबंध सुदृढ करण्यासाठी संगीताच्या माध्यमातूनही प्रयत्न होत आहेत. ‘के-पॉप’ हा प्रकार जगभर प्रसिद्ध होत आहे. दक्षिण कोरियाची प्राचीन संगीतकला सर्वदूर पसरावी आणि अन्य देशांतील टॅलेंट, नव्या कला यांचा मेळ व्हावा, या उद्देशाने ‘के-पॉप’ स्पर्धेचे आयोजन केले जाते. भारतात या स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या होणार असून, यासंदर्भात कौन्सिल जनरल साँग युन कीम यांनी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला. ते म्हणाले की, अनेक शतकांपासून दक्षिण कोरियात संगीत-नृत्याची कला जोपासली जात आहे. आनंद व्यक्त करण्यासाठी संगीताचा आधार घेतला जातो. कोरियातील हिपहॉप संगीताचा जगभर नावलौकिक आहे. दक्षिण कोरियातील शाळांमध्ये रोजच्या अभ्यासातही संगीत कलेचा समावेश असतो. हे संगीत फक्त तरुणाईलाच नाही तर तिशी, चाळिशीच्या व्यक्तींच्याही पसंतीला उतरते. इंडोनेशिया, थायलंड, इजिप्त येथे झालेल्या स्पर्धेतूनही हे दिसून आले आहे. या स्पर्धेला येणारे प्रेक्षक तिशी-चाळिशीतले असतात. यांच्याकडून स्पर्धकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. भारतातही हिपहॉपची क्रेझ निर्माण होत आहे. गंगनम स्टाईल सध्या आपल्याकडे कमालीची लोकप्रिय ठरत आहे.
दक्षिण कोरियाची प्राचीन संगीतकला सर्वदूर पसरावी आणि अन्य देशांतील टॅलेंट नव्या कला यांचा मेळ व्हावा, या उद्देशाने ‘के-पॉप’ स्पर्धेचे आयोजन केले जाते. भारतात दिल्ली, सिक्कीम, मुंबई, कोलकाता, बंगळुरू आणि चेन्नई या ठिकाणी या स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या होणार आहेत. २ जुलै रोजी मुंबईत या स्पर्धेची प्राथमिक फेरी जयहिंद महाविद्यालयात पार पडणार आहे. या स्पर्धेत संगीत आणि नृत्य या दोन कलांची स्पर्धा रंगते.
>भारतीय राजकन्येशी नाते
२ हजार वर्षांपूर्वी भारतातील राजकन्या कोरियात आली होती. त्यानंतर कोरियातील प्रिस्ट तिबेट मार्गे भारतात आले. या मार्गे त्यांनी बुद्धिझम भारतातून दक्षिण कोरियात नेला. दक्षिण कोरियात फिरण्यासाठी वेगवेगळी ठिकाणे आहेत. आयलंड आणि पहाड समृद्ध आहेत. भारतातून आलेल्या राजकन्येने कोरियात जेथे वास्तव्य केले, ती ठिकाणे कोरियातील महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळ आहे.

Web Title: Agreement in South Korea, University of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.