कांदिवलीतील दामूनगरात अग्नितांडव
By Admin | Updated: December 8, 2015 01:25 IST2015-12-08T01:25:19+5:302015-12-08T01:25:19+5:30
कांदिवली पूर्वेकडील दामूनगर झोपडपट्टीला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत तब्बल दोन हजारांहून अधिक झोपड्या खाक झाल्या. या आगीत दोघांचा मृत्यू झाला असून, अकरा जण जखमी झाले आहेत.

कांदिवलीतील दामूनगरात अग्नितांडव
मुंबई: कांदिवली पूर्वेकडील दामूनगर झोपडपट्टीला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत तब्बल दोन हजारांहून अधिक झोपड्या खाक झाल्या. या आगीत दोघांचा मृत्यू झाला असून, अकरा जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी एकाचे नाव प्रल्हाद खरात (४५) असे असून, दुसऱ्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. अकरा जखमींवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत सुमारे ५० सिलिंडर स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तथापि, एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर या झोपडपट्टीत आले कसे, की हे सगळे घरगुती वापराचे सिलिंडर्स होते, हे प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरीत आहेत.
दामूनगर झोपडपट्टी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून आहे. लगतच समतानगर ही झोपडपट्टी आहे. दामूनगरमधील झोपड्यांची संख्या सुमारे साडेतीन हजार आहे. या झोपडपट्टीत सुमारे ३५ हजार रहिवाशी वास्तव्य करतात. सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दामूनगरमधील झोपडपट्टीतील एका गोदामाला आग लागली. गोदामाला लागलेली आग काही वेळातच बाजूच्या झोपड्यांपर्यंत पसरली. तेथील घरांमधील सिलिंडरचे स्फोट होऊ लागले आणि आग अधिकच पसरली, असे उपस्थितांनी
सांगितले. (प्रतिनिधी)
16 फायर इंजिन, १२ पाण्याचे टँकर्स आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. त्याचप्रमाणे, १०८ क्रमांकाच्या
११ रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या २ रुग्णवाहिका मुंबई अग्निशमन दलातर्फे तेथे नेण्यात आल्या. दामूनगर झोपडपट्टी दाटीवाटीने उभी असल्याने, घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यात अनेक अडथळे येत होते. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना सहकार्य केले. अखेर सायं. ४.२५ वाजता ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
आर्थिक मदत द्या : पर्यावरणमंत्री रामदास कदम, स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे आणि उपनगराचे जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी घटनस्थळाची पाहणी केली. शासनाने दुर्घटनाग्रस्तांचे याच ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी मागणी सुर्वे यांनी केली. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख, गंभीर जखमींना प्रत्येकी २ लाख, किरकोळ जखमींना १ लाख आणि ज्यांची झोपडी बेचिराख झाली आहे, त्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
सिलिंडरच्या स्फोटामुळे भडका
दामूनगर झोपडपट्टीमध्ये एका घरात सिलिंडरचा स्फोट होऊन आग भडकल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर येत आहे. झोपड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकचा साठा होता. त्यामुळे आग पसरली. प्रत्येक घरात सिलिंडर असल्याने आगीचे लोट आणखी पसरले आणि दोन हजारांहून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या, असे उत्तर पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त फतेहसिंग पाटील यांनी सांगितले. या घटनेची नोंद समतानगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.
सिलिंडरचे स्फोट ५० की १५?
दामूनगरमधील आग ही सिलिंडर स्फोटामुळे भडकल्याचे स्पष्ट चित्र आहे. मात्र, येथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सिलिंडर आले कुठून, हा प्रश्न अनुत्तरित आहे. महत्त्वाचे म्हणजे ,स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आगीदरम्यान तब्बल ५० सिलिंडर्सचे स्फोट झाले, पण अग्निशमन दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलिंडर्स स्फोटांची संख्या १५ ते २० एवढीच होती. परिणामी, सिलिंडर्सच्या स्फोटांचा नेमका आकडा गुलदस्त्यात आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतरच आगीचे नेमके कारण आणि सिलिंडर्स स्फोटातील सत्यता समोर येऊ शकेल.
जखमींची नावे : पार्वती शंकर नानुबा (६०),
सुमित्रा भानुदास रेक्षा (३०), रमा सुनील कांबळे (५४), सोनू गुप्ता (२४), नझीर शेख (३५), आशा उगाडे (२६), जॅकी कागडा (२५), वैशाली मस्के (२८), सुरेश तेडीगिनकेरी (२२), सुरेंद्र कृष्णा पोळे (२२), सानिया राजेश सिंह (८).