मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे बुजवून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2016 01:57 IST2016-09-27T01:57:55+5:302016-09-27T01:57:55+5:30
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे श्रमदानातून बुजवून काँग्रेस कार्यकत्यांनी सोमवारी ओसरगाव (ता.कणकवली) येथे अनोखे आंदोलन केले.
मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे बुजवून आंदोलन
कणकवली (सिंधुदुर्ग) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे श्रमदानातून बुजवून काँग्रेस कार्यकत्यांनी सोमवारी ओसरगाव (ता.कणकवली) येथे अनोखे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले. या वेळी राणे यांनी राज्य शासन, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर सडकून टीका केली.
राणे म्हणाले, की मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवली ते सावंतवाडी दरम्यानच्या भागात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालविणे अशक्य झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे २५ सप्टेंबरपर्यंत बुजविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री, बांधकाममंत्री आणि पालकमंत्री
यांनी दिले होते़. तरीदेखील सिंधुदुर्गातील महामार्ग अद्यापही तसाच खड्डेमय आहे. हे निष्क्रिय शासनाचे अपयश आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी काँग्रेसने श्रमदानातून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे.
केरळच्या धर्तीवर सिंधुदुर्गचा विकास करण्याची वल्गना करण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी सुंदर सिंधुदुर्गचा अभ्यास करावा. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करून केरळला मॉडेल वाटेल, असे विकासाचे मॉडेल बनविण्याचे धाडस दाखवावे. विकास प्रक्रियेत सिंधुदुर्गचे नाव आघाडीवर असताना या निष्क्रिय पालकमंत्र्यांनी जिल्हा अधोगतीकडे नेला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पावसातही हे खड्डे बुजविता आले असते; पण निष्क्रिय शासनाच्या मंत्र्यांमुळे विकास प्रक्रियेत जिल्हा मागे गेल्याचा आरोप राणे यांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)
वाहनचालकांमध्ये समाधान
- या आंदोलनामुळे वाहनचालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत होते. खड्डे बुजविण्यासाठी खडी, ग्रीट, तसेच सिमेंट यांचे मिश्रण वापरण्यात आले. ‘महामार्गावर काँग्रेसच्या माध्यमातून खड्डे बुजविण्यासाठी श्रमदान’असे फलक लावलेले अनेक डंपर साहित्याची वाहतूक करताना दिसत होते.