पुन्हा एक कोपर्डी - पीडितेच्या घरावर दगडफेक
By Admin | Updated: July 31, 2016 18:34 IST2016-07-31T18:34:09+5:302016-07-31T18:34:09+5:30
पीडित मुलीच्या घरावर रविवारी दुपारी दगडफेक करण्यात आली़ यामध्ये पीडित मुलगी जखमी झाली असून, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडितेच्या घराला पोलीस संरक्षण देण्यात आले

पुन्हा एक कोपर्डी - पीडितेच्या घरावर दगडफेक
ऑनलाइन लोकमत
कर्जत, दि. ३१ : भांबोरा (ता़ कर्जत) येथील पीडित मुलीच्या घरावर रविवारी दुपारी दगडफेक करण्यात आली़ यामध्ये पीडित मुलगी जखमी झाली असून, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडितेच्या घराला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे़ दरम्यान शिवसनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी आज पीडितेच्या घरी भेट दिली़
त्यानंतर गावकऱ्यांशी बोलताना त्या म्हणाल्या, मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवू नका, गावागावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करा, आरोपींना शिक्षा होईपर्यंत या घटनेचा मी पाठपुरावा करील, मुलींसाठी विशेष स्कूल बस सुरु करण्यासाठी महिला आयोगाकडे पाठपुरावा करील, पीडीत मुलीला संरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करील, असे त्यांनी सांगितले़.
याचवेळी पीडितेच्या घरावर दगडफेक झाल्याचा निरोप आला़ त्याबरोबर सर्व ग्रामस्थ, गोऱ्हे हे पीडितेच्या घरी दाखल झाले़ मोठा जमाव येत असल्याचे पाहून दगडफेक करणाऱ्यांनी तेथून धूम ठोकली़ निलम गोऱ्हे यांनी पीडितेच्या हाताला ड्रेसींग केले़ यावेळी नगरच्या महापौर सुरेखा कदम, जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, तालुकाध्यक्ष बिभीषण गायकवाड, राजेश परकाळे, घनशाम शेलार आदी उपस्थित होते़.
दरम्यान, कोपर्डी बलात्काराच्या घटनेबद्दल संपूर्ण राज्यात संतापाची भावना कायम असताना अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. नांदगाव शिंगवे गावामध्ये शेजारी रहाणा-या १५ वर्षाच्या मुलीला भांडी घासण्यासाठी घरी बोलवून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. पीडित तरुणी आरोपीच्या घराशेजारी रहाते. आरोपी मल्हारी उमपने भांडी घासण्याच्या बहाण्याने तिला घरी बोलावले व साथीदाराच्या मदतीने तिच्यावर अत्याचार केला.