मराठी बोलल्याने विद्यार्थ्यांना झोडले
By Admin | Updated: July 10, 2014 08:42 IST2014-07-10T01:54:11+5:302014-07-10T08:42:59+5:30
परस्परांशी मराठीत का बोलता, अशी विचारणा करत आठवीेतील २९ विद्यार्थ्यांना काठीने झोडून काढल्याची घटना पुण्यात घडली.

मराठी बोलल्याने विद्यार्थ्यांना झोडले
भोसरी (जि. पुणे) : परस्परांशी मराठीत का बोलता, अशी विचारणा करत आठवीेत शिकणा:या तब्बल २९ विद्यार्थी-विद्यार्थिनींना संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिका:याने काठीने झोडून काढले. सर्वाच्या अंगावर काळेनिळे वळ उठले आहेत. ही मुले प्रचंड धास्तावली आहेत, तर शाळेतून काढून टाकतील या भीतीने पालकांनी पोलिसांत तक्रारीला नकार दिला आहे.
भोसरी दिघी रोड येथील प्रियदर्शनी इंग्रजी माध्यम शाळेत (सँडविक कॉलनी) बुधवारी दुपारी दोनला ही घटना घडली. सर्व मुलांनी संपूर्ण शाळा वेळेत इंग्रजीतच संभाषण करावे, अशी सक्ती शाळेत आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक वर्गात एका मुलाची (लँग्वेज मॉनिटर) नियुक्ती केली आहे. दर आठवडय़ाला ही नोंदवही संस्थाचालक जितेंद्र सिंग पाहतात.
बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास ही वही पाहिल्यावर सिंग यांनी आठवीतील मुलांना वर्गातून आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. यानंतर काठीने प्रत्येकाला झोडपून काढण्यास सुरूवात केली. हात, पाय आणि पाठीवर फटके बसू लागल्याने मुले जोरजोरात ओरडू लागली. तेव्हा त्यांना पुन्हा मारण्यास सुरूवात केली. आठ दिवसांत किती वेळा मराठीत बोलला तितक्यावेळा प्रत्येकाला फटके दिले. नंतर ही मुले पुन्हा वर्गात बसली. त्यावेळी त्यांची स्थिती पाहून इतर विद्यार्थीही घाबरले.
विद्यार्थी घरी परतल्यावर पालकांना मारहाणीचा प्रकार समजला. सर्वजण शाळेत गेले; परंतु, सुरक्षारक्षकाने अगोदरच मुख्य प्रवेशद्वार बंद करून प्रवेशास मनाई केली. तसेच सिंग यांच्याविषयी अधिक माहिती देण्यासही नकार दिला. यानंतर सर्व पालक पुन्हा एकत्र आले. काहींनी मुलांसाठी काम करणा:या ‘चाइल्ड लाईन’ या स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधला.
पालकांनी पोलिसांत तक्रार द्यायला नकार दिला आहे.
शाळेविरोधात फिर्याद देणार
या शाळेतील हा प्रकार अतिशय भयानक आणि संतापजनक आहे. याबाबत पालकांशी, विद्याथ्र्याशी बोलणो झाले असून आमच्या संस्थेच्यावतीने प्रियदर्शनी शाळेविरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद देणार आहोत, अशी माहिती चाईल्ड लाईन संस्थेच्या प्रतिनिधी गायत्री पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. संस्थाचालक जितेंद्र सिंग याने आपला भ्रमणध्वनी बंद ठेवल्याने संपर्क होऊ शकला नाही.