मोदी परतल्यावर अनंत गीते देणार मंत्रिपदाचा राजीनामा
By Admin | Updated: September 29, 2014 14:25 IST2014-09-29T13:09:51+5:302014-09-29T14:25:24+5:30
राज्यातील सेना-भाजपाची २५ वर्षांची युती तुटल्यानंतर केंद्रातील युतीही संपुष्टात येणार असून शिवसेनेचे अनंत गीते मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत.

मोदी परतल्यावर अनंत गीते देणार मंत्रिपदाचा राजीनामा
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या तिढ्यावरून सेना-भाजपाची २५ वर्षांची युती तुटल्यानंतर केंद्रातील युतीही संपुष्टात येणार असून शिवसेनेचे अनंत गीते मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. केंद्रातील सत्तेतून शिवसेना बाहेर पडणार असून नरेंद्र मोदी भारतात परतल्यावर अनंत गीते त्यांच्याकडे राजीनामा देतील असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपाने केंद्रात सत्ता स्थापन केली, त्यावेळी शिवसेना नेते अनंत गीते यांच्याकडे अवजड उद्योग खाते सोपवण्यात आले. विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून शिवसेना- भाजपाची युती संपुष्टात आली, मात्र केंद्रातील युती तशीच राहिली. त्यावरून शिवसेनेवर टीका होत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही रविवारच्या सभेत सेनेवर टीकास्त्र सोडले होते. राज्यातील युती दुभंगलेली असताना केंद्रात व महापालिकेत एकत्र राहण्याचे हे शिवसेनेचे ढोंग कशाला, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. भाजपाने एवढा अपमान केल्यावर केंद्रातील मंत्रीपद ठेवल्याबद्दल त्यांनी उद्धव यांना टोला हाणला होता.
या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनंत गीते मंत्रीपदाचा राजीनामा देतील असे सांगत केंद्रातील सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला.