सेबीच्या नोटिशीनंतर सहकारमंत्री नरमले

By Admin | Updated: August 17, 2016 18:40 IST2016-08-17T18:40:50+5:302016-08-17T18:40:50+5:30

लोकमंगल अ‍ॅग्रो साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांकडून जमा केलेली शेअर्सची रक्कम व्याजासह परत करण्याची आपली तयारी आहे

After the notice of SEBI, the Minister of Cooperation softened | सेबीच्या नोटिशीनंतर सहकारमंत्री नरमले

सेबीच्या नोटिशीनंतर सहकारमंत्री नरमले

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 17 - लोकमंगल अ‍ॅग्रो साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांकडून जमा केलेली शेअर्सची रक्कम व्याजासह परत करण्याची आपली तयारी आहे. मात्र यात कोणताही गैरव्यवहार नाही. कदाचित अनियमितता किंवा तांत्रिक चूक असू शकेल, असा खुलासा राज्याचे सहकार, पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात बोलताना केला.
लोकमंगल अ‍ॅग्रो कंपनीने साखर उद्योग उभारणीसाठी ४ हजार ७५१ शेतकरी गुंतवणूकदारांकडून ७४ कोटी ८२ लाख रुपयांचे शेअर्स (भाग भांडवल) जमा केल्याप्रकरणी सेबीने मंत्री सुभाष देशमुखांसह कंपनीच्या १२ संचालकांना नोटिसा बजावल्या होत्या. ही रक्कम शेतकऱ्यांना सव्याज परत करण्याचे आदेश सेबीने दिले आहेत. त्याच बरोबर कंपनीच्या संचालकांना रोखे बाजारात व्यवहार बंदी करण्याचे आदेश सेबीकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमंगलचे सर्वेसर्वा आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी वरील खुलासा केला.

ते म्हणाले, लोकमंगलने कारखान्यासाठी गावोगाव फिरुन शेअर्स गोळा केले आहेत. एका दिवशी ३९ पेक्षा अधिक सभासदांना शेअर्स विक्री करता येत नाही. ही तांत्रिक अडचण होती. त्यामुळे शेअर्स विक्रीत कदाचित अनियमितता आली असेल. पण यात कसलीही फसवणूक केली नाही. कायद्याचे अज्ञान असल्यामुळे काही चुका झाल्याची कबुली देशमुख यांनी दिली.
सेबीने शेतकऱ्यांना शेअर्सच्या रकमा व्याजसह परत करण्याचे आदेश दिले असतील. तर तातडीने त्याची अंमलबजावणी करण्याची माझी तयारी आहे, असे स्पष्टीकरणही देशमुख यांनी दिले. या प्रकरणात गैरव्यवहार झाला नाही, कोणत्याही बँकेने तशी तक्रार केली नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून राजीखुशीने शेअर्स जमा केले आहेत. त्याचा हिशोब ठेवण्यात काहीसी गडबड असू शकेल. पण कोणाचीही फसवणूक केली, असे म्हणता येणार नाही. सेबीच्या नोटिसीला कायदेशीर मार्गाने उत्तर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सुब्रतो रॉयशी तुलना चुकीची !
लोकमंगल अ‍ॅग्रो शेअर्स संकलन आणि सहारा समुहाचे सुब्रतो रॉय यांच्या व्यवहाराशी तुलना केली जात आहे. याबद्दल खंत व्यक्त करीत देशमुख म्हणाले, ही तुलना चुकीची आहे. सहारा समुहाने गुंतवणूकदारांच्या ठेवी स्वीकारल्या होत्या. त्यात गैरव्यवहाराचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. लोकमंगलने शेतकऱ्यांकडून ठेवी नव्हे तर शेअर्सची रक्कम स्वीकारली आहे. शेअर्सधारक त्या कंपनीचे मालक असतात. ठेवीदारांबाबत तसे म्हणता येत नाही. सेबीच्या नोटिशीवर कायदेशीर उत्तर देणार आहे. त्याबद्दल प्रतिक्रिया देणार नाही. यासंदर्भात माझे कामच बोलेल. यापूर्वी लोकमंगल बँकेवरही असेच गंभीर आरोप झाले होते. मला आरोप नवीन नाहीत.
-सुभाष देशमुख
सहकार, पणनमंत्री

Web Title: After the notice of SEBI, the Minister of Cooperation softened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.