मनसेच्या विरोधानंतर आरेतील मेट्रो कारशेड सायडिंगला
By Admin | Updated: March 25, 2015 16:30 IST2015-03-25T16:14:04+5:302015-03-25T16:30:47+5:30
मुंबईतील आरे येथील मेट्रो ३ च्या प्रस्तावित कारशेडला शिवसेना व मनसेने प्रखर विरोध दर्शवल्यानंतर राज्य सरकारने आता नरमाईची भूमिका घेतली आहे.

मनसेच्या विरोधानंतर आरेतील मेट्रो कारशेड सायडिंगला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - मुंबईतील आरे येथील मेट्रो ३ च्या प्रस्तावित कारशेडला मनसेने प्रखर विरोध दर्शवल्यानंतर राज्य सरकारने आता नरमाईची भूमिका घेतली आहे. आरे येथील प्रस्तावित कारशेडच्या कामाला सध्या स्थगिती दिली आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
मुंबईतील हरीतपट्टा म्हणून ओळखल्या जाणा-या आरे कॉलनीतील मेट्रो ३ साठी कारशेड बांधण्याचा घाट राज्य सरकारने घातला होता. या कारशेडमुळे आरे कॉलनीतील वनसंपदा व तेथील वन्यप्राणी धोक्यात येतील असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे होते. मात्र या विरोधाला झुगारुन मेट्रो ३ च्या कारशेडसाठी कंत्राटदाराने कामही सुरु केले होते. आरेच्या रक्षणासाठी मनसेने पुढाकार घेत आक्रमक पवित्रा घेतला होता. मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी आरे कॉलनीची पाहणी करत मेट्रो ३ कारशेड अन्यत्र हलवण्याची मागणी केली होती. मनसे व पर्यावरण प्रेमींच्या विरोधानंतर राज्य सरकारने आता नमते घेत आरेतील मेट्रो ३ च्या कारशेडला स्थगिती दिली. या संदर्भात तज्ज्ञांची समिती नेमली असून या समितीच्या अहवालानंतर योग्य निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.