बलात्कार पीडितेशी विवाहानंतरही गुन्हा रद्द नाही
By Admin | Updated: July 10, 2016 04:05 IST2016-07-10T04:05:43+5:302016-07-10T04:05:43+5:30
मुलीवर बलात्कार करून तिच्याशी विवाह करणाऱ्या आरोपीवरील गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, आरोपी आणि पीडितेमधील तडजोडीला

बलात्कार पीडितेशी विवाहानंतरही गुन्हा रद्द नाही
मुंबई : मुलीवर बलात्कार करून तिच्याशी विवाह करणाऱ्या आरोपीवरील गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, आरोपी आणि पीडितेमधील तडजोडीला कायद्यामध्ये स्थान नाही, असे उच्च न्यायालयाने आरोपीची याचिका फेटाळताना म्हटले.
मोहम्मद फैझन आमीर खान याने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरला विवाहाचे आमिष दाखवून २०१४पासून वारंवार तिच्यावर बलात्कार केला. याबद्दल पोलिसांनी त्याच्यावर भारतीय दंडसंहिता कलम ३७६ अंतर्गत गुन्हा नोंदवला.
खानच्या म्हणण्यानुसार, त्याच्यात आणि त्याच्या जोडीदारामध्ये गैरसमज निर्माण झाला. त्यामुळे त्याच्या जोडीदारानेने पोलिसांत तक्रार केली. आता या दोघांमधील गैरसमज दूर झाले असून, त्यांनी विवाह केला आहे. त्यामुळे खानविरुद्ध नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा.
आरोपीला त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविल्याचे समजले त्या वेळी आरोपी पीडितेशी विवाह करण्यास तयार झाला. आरोपीचे वर्तन समजून घ्यायला हवे. आपल्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे आणि पोलीस शोधत आहेत, हे समजल्यावर आरोपीने मुद्दाम पीडितेशी विवाह केला,’ असे निरीक्षण न्या. नरेश पाटील व न्या. पी. डी. नाईक यांच्या खंडपीठाने नोंदवले.
आरोपीने पीडितेशी २९ एप्रिल रोजी विवाह केला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३० एप्रिल रोजी त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पीडितेने लगेचच गुन्हा रद्द करण्यासाठी संमतीपत्र दिले. एकंदरीत घटनेवरून आरोपीचे वर्तन संशयास्पद आहे. त्यामुळे आरोपीने पीडितेशी विवाह केला असला तरी आम्ही त्याच्यावरील एफआयआर रद्द करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, हत्या, बलात्कार, दरोडा इत्यादींसारखे गुन्हे तडजोड करून रद्द केले जाऊ शकत नाहीत, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, २०११मध्ये आरोपी आणि पीडितेमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. २०१४मध्ये आरोपीला मुंबईमध्ये नोकरी मिळाल्याने आरोपीने पीडितेला त्याच्याबरोबर उत्तर प्रदेशहून मुंबईत येण्यास सांगितले. मुंबईत हे दोघेही एकत्र राहत होते. या दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. पीडितेने त्यास विरोध केला नाही; कारण आरोपीने तिला विवाहाचे खोटे आश्वासन दिले.
जानेवारी २०१६मध्ये आरोपी पीडितेला न सांगताच उत्तर प्रदेशला परत गेला. तिने त्याच्याशी संपर्क केला असता आरोपीने मुंबईस परत येण्यास नकार दिला. तसेच तिच्याशी विवाह करण्यासही नकार दिला. त्यामुळे मुलीने त्याच्याविरुद्ध पोलीस तक्रार केली. (प्रतिनिधी)