कोकमनंतर दापोलीतील महाजनांचा आता चिंचेवरचा ‘सोडा’
By Admin | Updated: November 17, 2014 23:24 IST2014-11-17T22:32:45+5:302014-11-17T23:24:38+5:30
भविष्यात कोकणातील दुर्लक्षित फळांच्या रसापासून सोडा बनवून फळांना दर्जा प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रगतशील शेतकरी विनय महाजन यांनी सांगितले.

कोकमनंतर दापोलीतील महाजनांचा आता चिंचेवरचा ‘सोडा’
शिवाजी गोरे - दापोली --मुंबईत शीतपेयाच्या कंपनीत काम करताना पाहिलेले दृश्य थक्क करणारे होते. शीतपेयामुळे लोखंडाच्या पार्टवर पडलेले छिद्र पाहून मन सुन्न झाले. त्यातूनच शरीराला हानिकारक नसलेली पेय बनवण्याचा निर्णय घेतला. २० वर्षांपूर्वी गावाकडे येऊन दुर्लक्षित कोकमापासून कोकम सोडा तयार केला. कोकम सोड्याला मिळालेला प्रतिसाद पाहून २० वर्षांत विविध प्रयोग केले. आत चिंचेपासून सोडा बनविला असून, भविष्यात कोकणातील दुर्लक्षित फळांच्या रसापासून सोडा बनवून फळांना दर्जा प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रगतशील शेतकरी विनय महाजन यांनी सांगितले.
कोकणात आंबा, काजू, फणस, करवंद, जांभूळ, आवळा, कोकम ही फळे मोठ्या प्रमाणावर उत्पादीत होतात. मात्र, दरवर्षी आंब्याचे गडगडणारे दर पाहून शेतकऱ्याला कवडीमोल किमतीने आंबा विकण्याची वेळ येते. फणस, करवंद, जांभूळ ही फळे मोठ्या प्रमाणावर कोकणात येतात. परंतु करवंदावर केवळ २० टक्केच प्रक्रिया केली जाते. मोठ्या प्रमाणावर लोह करवंदातून मिळते. जांभूळसुद्धा आयुर्वेदिक फळ आहे. लाखो टन काजूबोंडे वाया जातात. काजूबोंडावर प्रक्रिया केल्यास त्याच्या रसापासून वाईन, काजूसोडा, काजू बिस्कीट विविध पदार्थ तयार होऊ शकतात. मात्र, यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. शेतकरी व छोटे उद्योजक यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने कोकणातील २० टक्के फळावरच प्रक्रिया केली जाते. फळ प्रक्रिया उद्योगाला चालना दिल्यास रोजगाराची चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. कोकणातील काजूबोंड, करवंद, फणस, जांभूळ, आवळा, आंबा ही फळे आयुर्वेदिक फळे आहेत. या फळातून शरीराला कोणतीही हानी होत नाही.
कोकणात २० वर्षांपूर्वी कोकम, जांभूळ, करवंद, काजूबोंड, फणस या फळांना कवडीमोल किंमत होती. करवंद, कोकम या दोन्ही फळांना आयुर्वेदात फार महत्त्व आहे. असे असूनसुद्धा ७० टक्के फळे जंगलात कुजून नष्ट व्हायची. त्यामुळे या फळांना दर्जा मिळवून देण्यासाठीच आपण फळांच्या रसापासून सोडा बनवण्याचा निर्णय घेतला, असे महाजन म्हणाले.
मुंबई येथे एका नामवंत कंपनीत काम करताना फार वाईट अनुभव आला. कंपनीमध्ये शीतपेयाच्या बाटल्या भरताना सांडलेले पेय लोखंडी पार्टवर पडून त्या पार्टला अक्षरश: छिद्र पडली होती. सांडलेल्या पेयामुळे लोखंडाला छिद्र पडू शकतात, तर मनुष्याच्या पोटाचे काय होत असेल. ही कल्पना सतावू लागली. शीतपेयातील कीटकनाशक द्रव्य पाहून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. नामवंत कंपनीतील नोकरी सोडून त्या कीटकनाशके मिश्रीत शीतपेयाला पर्याय म्हणून शरीराला हानिकारक नसलेला कोकम सोडा बनवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला चार वर्षे कोळथरे येथे कोकम सोडा फॅक्टरी सुरु केली, असे ते म्हणाले.
कोकम सोड्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे कुडावळे येथे जमीन खरेदी करुन हा प्रकल्प कुडावळे येथे उभा राहिला. सुरुवातीच्या काळात फार अडचणींना तोंड द्यावे लागले. ग्रामपंचायतीकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, असे ते म्हणाले.
फळप्रक्रिया उद्योगापुढे काही अडचणी आहेत. त्या प्रामुख्याने सोडविणे गरजेचे आहे. फळप्रक्रिया उद्योग हा बारमाही सुरु राहण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी शीतसाखळी गरजेची आहे. स्थानिक उद्योजकांना फळप्रक्रिया उद्योगात छोट्या छोट्या तांत्रिक अडचणी येतात. त्या अडचणी कृषी विद्यापीठाकडून सुटाव्यात. कोकणात टेस्टिंग लॅबची गरज आहे. कोकण कृषी विद्यापीठाने टेस्टिंग करुन दिल्यास वेळ व पैशांची बचत होऊ शकते.
- विनय महाजन, प्रगतशील शेतकरी
चिंचेपासून चिंचसोडा बनवण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. चिंचेपासून सोडा बनवण्यामागचा हेतू एवढाच आहे की, कोकणात मोठ्या प्रमाणावर चिंचेची लागवड होऊ शकते. परंतु मार्केट नसल्यामुळे त्याची कोण लागवड करत नाही. आता चिंचेपासून सोडा बनविला जाऊ लागल्याने त्याला नक्कीच मार्के ट उपलब्ध होईल. सध्या चिंच बाहेरुन खरेदी केली जात आहे, असे महाजन यांनी यावेळी बोलताना सांगितले.