अपहरणानंतर प्रेयसीची हत्या करुन मृतदेह पुरला
By Admin | Updated: September 18, 2014 00:41 IST2014-09-18T00:41:52+5:302014-09-18T00:41:52+5:30
दोन महिन्यांपूर्वी न्यायालय परिसरातून बेपत्ता झालेल्या निलोफर परवीन शेख (२३) या तरुणीचा मृतदेह बुधवारी कब्रस्तानच्या मागील परिसरातील जंगलात दफन केलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली.

अपहरणानंतर प्रेयसीची हत्या करुन मृतदेह पुरला
वर्धा : दोन महिन्यांपूर्वी न्यायालय परिसरातून बेपत्ता झालेल्या निलोफर परवीन शेख (२३) या तरुणीचा मृतदेह बुधवारी कब्रस्तानच्या मागील परिसरातील जंगलात दफन केलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी राकेश पांडे, सुनील विटकर व राहुल मडावी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वर्धेतील इंदिरानगर झोपडपट्टीतील रहिवासी निलोफर परवीन ही युवती ५ जुलै रोजी जिल्हा न्यायालयात प्रियकर राकेश पांडेला भेटायला गेली होती. मात्र ती घरी पोहोचलीच नाही. यानंतर तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र काहीही उपयोग झाला नाही. अखेर १७ जुलै रोजी तिच्या कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाण्यात निलोफर परवीन ही बेपत्ता असल्याची फिर्याद नोंदविली. मात्र या प्रकरणातही पोलिसांनी आपल्या उदासीन कारभाराचा परिचय देत तपासात मंद गती ठेवली. या प्रकरणातील वास्तव पुढे येताच पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. निलोफर परवीनची मोठी बहीण राणी यादव हिने आपल्या बहिणीच्या बेपत्ता होण्यामागे तिचा प्रियकर राकेश पांडे याचाच हात असल्याचा संशय व्यक्त केला. ही बाब पोलिसांनाही सांगितली. यानंतर पोलिसांनी सूत्र हलवून हाती आलेल्या सक्षम पुराव्याच्या आधारे राकेश पांडे याला ताब्यात घेतले. त्याची कसून विचारपूस केली असता त्याने निलोफरचे न्यायालय परिसरातून अपहरण केल्याचे मान्य केले.
इतकेच नव्हे, तर तिची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी कब्रस्तानच्या मागील परिसरात असलेल्या जंगलात तिचा मृतदेह दफन केल्याचेही कबूल केले. या प्रकरणात राकेशचे मित्रही असल्याचे लक्षात येताच सुनील विटकर व राहुल मडावी यांना ताब्यात घेतले. आरोपींना घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, तहसीलदार राहुल सारंग यांनी सेवाग्राम व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या चमूसह घटनास्थळ गाठले. आरोपीच्या सांगण्यानुसार दफन केलेल्या जागेचे खोदकाम केले असता निलोफरचा मृतदेह गवसला.
या कारवाईत शहर ठाण्याचे प्रमोद जांभुळकर, गजानन कठाणे, मनोहर मुडे, संजय राठोड, सचिना वाटखेडे, रितेश शर्मा यांचा समावेश होता. प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)