सुट्टीचा मोका साधून ‘तो’ येणार
By Admin | Updated: July 10, 2016 00:43 IST2016-07-10T00:43:32+5:302016-07-10T00:43:32+5:30
रविवारच्या बेत आखताना पावसाचा रागरंग पाहून घ्या. राज्यात जोर धरलेला पाऊस सुट्टीचा मोका साधून धो-धो पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र

सुट्टीचा मोका साधून ‘तो’ येणार
पुणे : रविवारच्या बेत आखताना पावसाचा रागरंग पाहून घ्या. राज्यात जोर धरलेला पाऊस सुट्टीचा मोका साधून धो-धो पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
शनिवारी दिवसभरात विदर्भापाठोपाठ कोकण, मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस झाला. गेल्या २ दिवसांपासून कोरडा असलेल्या मराठवाड्यातही पावसाने हजेरी लावली आहे.
विदर्भात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाल्याने धरणांमधील साठ्यात वाढ झाली आहे.
सांगली, सातारा जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी पावसाचा
जोर होता. मुंबईत अधूनमधून सरींवर-सरी येत होत्या. शहरात ३.८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनुक्रमे १४.६०, ८.५१ मिलीमीटर पाऊस झाला. पुण्यातही सरी बरसल्या. मराठवाड्यात जालना, नांदेड जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली.
जून अखेरपर्यंत अवघ्या ५० टक्क्यांवर असलेल्या पेरण्या गेल्या ८ दिवसांत १३ टक्क्यांनी वाढून ६३ टक्क्यांवर पोहोचल्या आहेत. उर्वरित पेरण्या चार दिवसांत पूर्ण होतील, अशी शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली. (प्रतिनिधी)
पाऊस सरासरी गाठेना
जून महिना कोरडा गेल्याने राज्यात पावसाने अजूनही सरासरी गाठलेली नाही. आजपर्यंत एकूण ९० टक्केच पाऊस झाला आहे. सर्वात कमी पाऊस नाशिक जिल्ह्यात झाला असून, तो सरासरीच्या केवळ ४४ टक्केच पडला आहे.
नंदूरबार ५४ , कोल्हापूर ६०, धुळे ७१, जळगाव ७२, सोलापूर, उस्मानाबाद व औरंगाबाद ७५, यवतमाळ ७७ टक्के, भंडारा जिल्ह्यात ७८ टक्के पाऊस पडला आहे.
सांगली जिल्ह्यात सर्वाधिक १३८ टक्के पाऊस झाला. त्यापाठोपाठ रत्नागिरी १२० टक्के आणि पालघर जिल्ह्यात ११७ टक्के पाऊस झाला.
तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.