पतीच्या निधनानंतर ‘तिला’ अंधारकोठडीत डांबले
By Admin | Updated: July 20, 2016 05:51 IST2016-07-20T05:51:04+5:302016-07-20T05:51:04+5:30
मुलाच्या अपघाती निधनानंतर सुनेला मानसिक आधार देण्याऐवजी तिला वर्षभर अंधार कोठडीत डांबले.

पतीच्या निधनानंतर ‘तिला’ अंधारकोठडीत डांबले
वैभव बाबरेकर,
अमरावती- मुलाच्या अपघाती निधनानंतर सुनेला मानसिक आधार देण्याऐवजी तिला वर्षभर अंधार कोठडीत डांबले. धडधाकट शरीरयष्टीची ती मरणासन्न अवस्थेत पोहोचली. समाजमन सुन्न करणारा हा गंभीर प्रकार तिवसा तालुक्यातील कुऱ्हा या गावी उघडकीस आला. जयश्री सुरेश दुधे (३५) असे या अत्याचारग्रस्त महिलेचे नाव आहे.
भाऊराव कुऱ्हाडे यांची कन्या जयश्री हिचा विवाह २००१ मध्ये नांदेड जिल्ह्यातील माहुर येथील सुरेश दुधे यांच्याशी झाला. त्यांना दोन मुलगे व एक मुलगी झाली. सुखी संसारावर तीन वर्षांपूर्वी आघात झाला. जयश्रीचे पती सुरेश यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर सासरच्या मंडळीनी तिचा छळ सुरू केला. सुरेश यांच्या नावाने माहूर येथे १३ एकर शेतजमीन आहे. त्या शेतीच्या हव्यासापोटी हा छळ होता. वडलांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी जयश्रीला माहेरी आणले. परंतु सासरच्या लोकांनी माहेरी जाऊन गोडीगुलाबीने तिला पुन्हा सासरी नेले आणि तिचा छळ सुरू केला. व्जयश्रीला वर्षभर अंधार कोठडीत डांबून ठेवले. अपुरे जेवण दिले. मारहाण केली. यामुळे आता तिचा केवळ हाडाचा सापळाच शिल्लक राहिला. त्यानंतर १४ जुलै रोजी मरणासन्न स्थितीत तिला कुऱ्हा येथील माहेरी आणून सोडले. तिच्यावर उपचार सुरू आहेत.
>तीन चिमुकल्यांची
काळजी घेणार कोण?
जयश्रीला संकेत (९), ऐश्वर्या (७), प्रणव (५) अशी तीन मुले आहेत. त्यांचे संगोपन सासरची मंडळी करीत असली तरी जयश्रीच्या पित्याला नातवंडांची चिंता आहे. वडिलांची छत्रछाया गमावलेल्या, आई मरणाच्या दारात असलेल्या त्या चिमुकल्यांकडे लक्ष द्यायला कुणीच नाही.
माझ्या मुलीचा शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला. तिला अन्न पाण्याविना अंधाऱ्या खोलीत वर्षभरापासून डांबून ठेवण्यात आले. त्यामुळे ती कमालीची अशक्त झाली आहे. कुऱ्हा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविलीे. मात्र, पोलिसांनी दखल घेतली नाही.
- भाऊराव कुऱ्हाडे, जयश्रीचे वडील