लग्नघरात आग लागल्यानंतर मदतीसाठी सरसावले ग्रामस्थांचे हात
By Admin | Updated: May 4, 2017 09:03 IST2017-05-04T09:01:59+5:302017-05-04T09:03:08+5:30
मुलीचे लग्न कसे होणार या चिंतेत असताना उभाळे कुटुंबासाठी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे

लग्नघरात आग लागल्यानंतर मदतीसाठी सरसावले ग्रामस्थांचे हात
श्यामकांत सराफ / ऑनलाइन लोकमत
पाचोरा, (जळगाव), दि. ३ - पतीचे १५ वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतरही खंबीरपणे संसाराचा रहाटगाडा ओढत मुलीच्या सुखी संसाराची स्वप्न रंगविणाऱ्या भोजे येथील उभाळे कुटुंबाच्या घराला अचानक आग लागली. आगीत मुलीच्या लग्नासाठी आणले साहित्य व रोख रक्कम खाक झाली. मुलीचे लग्न कसे होणार या चिंतेत असताना उभाळे कुटुंबासाठी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे केल्याने शुक्रवार ५ मे रोजी नियोजित विवाह धुमधडाक्यात पार पडणार आहे.
पाचोरा तालुक्यातील भोजे येथील रहिवासी असलेल्या लिलाबाई गुणवंत उभाळे यांच्या घराशेजारी असलेल्या विद्युत रोहित्राला २२ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता अचानक आग लागली. या आगीत लिलाबाई उभाळे यांच्या घरातील मुलीच्या लग्नाचे साहित्य तसेच रोख रक्कम जळून खाक झाली.
पतीचे १५ वर्षांपूर्वी कॅन्सरमुळे निधन
१५ वर्षांपूर्वी पतीचे कॅन्सरच्या आजाराने निधन झाल्याने लिलाबाई गुणवंत उभाळे ही अबला संकटावर मात करीत मोलमजुरी करुन कुटुंबाचे रहाटगाडे ओढत होती. लिलाबाई यांना पाच मुली व एक मुलगा आहे. पतीच्या निधनानंतर शेती नाही. रहायला घर नाही अशा बिकट स्थितीत लिलाबाई यांनी शेतमजुरी करीत कुटुंबाचा सांभाळ करीत चार मुलींचे लग्न केले. त्या सर्व सासरी सुखी आहेत.
पाचव्या मुलीच्या विवाहाची केली तयारी
सरकारी ग्रा.पं.जागेवर मातीचे घर बांधले. मुलगी आशा हिला शाळेत शिक्षणासाठी पाठविले. मुलगी आशा हिचा विवाह जळगावच्या भूषण बापू माळी यांच्याशी ५ मे २०१५ रोजी भोजे गावी ठरवला. लिलाबाईने भाऊ खुशाल हिवाळे याच्या पाठबळावर लग्नासाठीचा किराणा, लग्नाचा बस्ता आंदणाची भांडे अशी तयारी केली.
आगीमुळे झाली उभाळे कुटुंबाची निराशा
उभाळे कुटुंबात लग्नाची तयारी सुरु असताना २२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा. घराशेजारीच असलेल्या वीज वितरण कंपनीच्या रोहित्राजवळील वीज वाहिनीजवळ अचानक आग लागली. यात लिलाबाई यांचे घर संसार तसेच आशाच्या लग्नासाठी घेतलेले सर्व साहित्य जळून खाक झाले. लिलाबाई पूर्णपणे हतबल झाल्या.
लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ धावले मदतीला
घराला लागलेल्या आगीत सर्व नष्ट झाल्याने उभाळे कुटुंबावर संकट कोसळले. भोजे गावातील नागरिकांनी उभाळे कुटुंबातील दुख: आपले मानले. प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा वाटा उचलला. त्यात कुणी रोख रक्कम तर कुणी किराणा, कपडे, साहित्यांची जबाबदारी उचलली. अनेकांनी मदतीचे हात पुढे केल्यामुळे आशाच्या लग्नाची पुन्हा जोमाने तयारी सुरु झाली. प्रा.राजेंद्र चिंचोले, मनिष भोसले व अरुण वाणी यांनी लग्नासाठी ४० हजार रुपयांचा किराणा माल घरपोहोच दिला. ग्रामस्थ मदतीला धावल्यानंतर लोकप्रतिनिधींनी देखील मदतीचा हात पुढे केला. त्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार किशोर पाटील, जि.प. सदस्य मधुकर काटे , माजी आमदार दिलीप वाघ, भोजे सरपंच दीपाली पवार, माजी जि.प. सदस्य उध्दव मराठे, जि.प. सदस्य दीपक राजपूत, माजी पं.स. सदस्य मधुकर गोरे, पहूरचे माजी पं.स. सदस्य बाबूराव घोंगडे, पिंपळगाव हरेश्वर मित्र मंडळाने रोख रक्कम व लग्न साहित्याची मदत केली. तहसीलदार बी.ए.कापसे यांनी आगीचा पंचनामा करीत शासकीय मदतही मंजूर केली. ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींकडून मदतीचा ओघ सुरुच असल्याने शुक्रवार ५ रोजी आशाचा विवाह नियोजित स्थळीच धूमधडाक्यात होणार आहे.