निवडणुकींनंतर काँग्रस बरोबर आघाडी होऊ शकते - छगन भुजबळ
By Admin | Updated: October 3, 2014 17:50 IST2014-10-03T17:50:03+5:302014-10-03T17:50:03+5:30
काँग्रेस हा आमचा मित्रपक्ष असल्याने निवडणुकीनंतर गरज भासल्यास आम्ही काँगेस सोबत युती करत पुन्हा सत्तास्थापन करु असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे

निवडणुकींनंतर काँग्रस बरोबर आघाडी होऊ शकते - छगन भुजबळ
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - काँग्रेस हा आमचा मित्रपक्ष असल्याने निवडणुकीनंतर गरज भासल्यास आम्ही काँगेस सोबत युती करत पुन्हा सत्तास्थापन करु असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे. तसेच पंतप्रधान मोदी हे त्यांच्या मार्केटिंगच्या कौशल्यामुळे आणि मीडियाने दिलेल्या प्रसिद्धीमुळे यशस्वी झाले असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. मोदी लाट आता ओसरली असून लोक आता भाजपाच्या प्रचाराला भुलणार नाहीत, त्याचप्रमाणे भाजपाचा चेहरा आता सर्व समावेशक राहिलेला नाही असे सांगत त्यांनी भाजपाचे स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत भाजपा समाजातील खालच्या स्तारातील जनतेला आणि त्यांच्या नेत्यांना आपल्यापासून लांब ठेवते असेही त्यांनी सांगतिले आहे. भाजपा सरकार हे काँग्रेसने केलेल्या कामांचे उद्घाटन करत स्वतः श्रेय लाटत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. भारताची मंगळ स्वारी असो किंवा कोलकाता हे लढाऊ जहाज असो हे शंभर दिवसांत मोदींनी केले आहे काय, असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. तसेच रेटून खोटे आरोप करणे ही भाजपाची रणनिती असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यशैलीबद्दल विचारले असता चव्हाण हे काहीही न करता शांत बसून राहतात, तर विलासरावांवर अनेक टिका झाल्या असल्या तरी ते सर्व परिस्थिती समजावून घेत आणि टिमच्या कप्तान प्रमाणे नेतृत्व करत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.