Manoj Jarange Maratha Reservation: "एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम शिंदे समिती स्थापन केली. या समितीच्या अभ्यासातून हैदराबाद गॅझेट पुढे आले, ज्यात मराठा समाजातील अनेक कुटुंबांची नोंद कुणबी म्हणून करण्यात आली होती. हाच आधार घेऊन पुढील काळात मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग खुला करण्याची दिशा ठरली", असे म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयाचे श्रेय अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
मनोज जरांगे यांनी आझाद मैदानात सुरू केलेले उपोषण २ सप्टेंबर रोजी संपवले. त्यानंतर एक पोस्ट लिहून खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर भाष्य केले.
खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, "मराठा समाजाच्या आरक्षणबाबत दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अनेक महत्वाच्या मागण्या आज महायुती सरकारने मान्य केल्या असून यामुळे हा दिवस मराठा समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरला आहे."
शिंदेंनी आरक्षणासंदर्भात ठोस पावले टाकली
"गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून आंदोलने सुरू होती. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर मराठा समाजाच्या मागण्यांकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले आणि त्याबाबत ठोस पावले उचलली", असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
"त्या अभ्यासामुळे हैदराबाद गॅझेटचा ऐतिहासिक निर्णय झाला"
"त्यांनी (एकनाथ शिंदे) सर्वप्रथम शिंदे समिती स्थापन केली. या समितीच्या अभ्यासातून हैदराबाद गॅझेट पुढे आले, ज्यात मराठा समाजातील अनेक कुटुंबांची नोंद कुणबी म्हणून करण्यात आली होती. हाच आधार घेऊन पुढील काळात मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग खुला करण्याची दिशा ठरली. आज या अभ्यासाच्या आधारे हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय जारी करण्यात आला", असे श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.
"ग्रामपातळीवर नोंदी तपासून मराठा समाजातील पात्र नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे", अशा भावना खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केल्या.
देवेंद्र फडणवीसांनी निर्णायक भूमिका बजावली
श्रीकांत शिंदे म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्यांवर गांभीर्याने विचार करून त्या आज मान्य केल्या आहेत. आंदोलन शांततेत मार्गी लावण्यासाठी त्यांनी निर्णायक भूमिका बजावली आणि शासन निर्णय प्रत्यक्ष अंमलात येण्यासाठी ठोस पावले उचलली."
"हा केवळ मराठा समाजाचा विजय नाही तर महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आज मराठा समाजाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांचे खूप खूप अभिनंदन", असे श्रीकांत शिंदे म्हणाले.