नाल्यापाठोपाठ आता गटारेही होणार मोकळी!
By Admin | Updated: August 5, 2016 03:08 IST2016-08-05T03:08:25+5:302016-08-05T03:08:25+5:30
शहराच्या विविध भागांत रविवारी झालेल्या पावसानंतर ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या

नाल्यापाठोपाठ आता गटारेही होणार मोकळी!
ठाणे : शहराच्या विविध भागांत रविवारी झालेल्या पावसानंतर ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या; अरुंद असलेल्या कल्व्हर्टमुळेच पाणी साचल्याचा दावा पालिकेने केला. परंतु, गटारांमधून पाण्याचा निचरा न झाल्याने ही वेळ आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे गटारावरील बांधकामांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. आॅक्टोबरपासून अशा सर्व बांधकामांवर हातोडा टाकण्याचा निर्णय पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.
घोडबंदर भागात नव्याने विकसित करण्यात आलेल्या रस्त्यांमध्येही गुडघाभर पाणी साचले होते. काही ठिकाणी मोठे कल्व्हर्ट, तर काही ठिकाणी छोटे कल्व्हर्ट अशामुळे या भागात पाणी साचल्याची माहिती आता समोर आली आहे. गटारातील गाळ सध्या काढण्याचे काम सुरू असून यामधून बाटल्यांसह इतर साहित्य बाहेर काढले जात आहे. गटारांची सफाईच वेळेत न झाल्याने ही वेळ आल्याचेही आता बोलले जात आहे. परंतु, काही ठिकाणी गटारांवरच असलेल्या बांधकामांमुळे गटारातील घाण काढणे शक्य होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच पावसाळ्यानंतर गटारावरील बांधकामांवर हातोडा टाकण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यापूर्वी नाल्यावरील बांधकामे तोडण्याची मोहीम पालिकेने राबवली. अनेक नाल्यांवरील बांधकामे पाडण्यात आली. त्याचाच आधार घेत जी बांधकामे संपूर्णपणे गटारावर असतील, त्यांच्यावर सुरुवातीला हातोडा टाकला जाईल.
>आधी होणार सर्वेक्षण
ठाण्यातील कोणकोणत्या भागात गटारावर अशा प्रकारे किती बांधकामे आहेत, याचा सर्व्हे येत्या काही दिवसांत केला जाणार आहे. त्यानंतर प्रभाग समितीनिहाय या बांधकामांवर हातोडा टाकण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर खाडीच्या आतमध्ये शिरकाव करून अतिक्रमण झालेल्या बांधकामांवरदेखील हातोडा टाकण्यात येणार आहे.