पूर्ण तपासानंतरच 'सनातन'वर बंदीचा निर्णय - गृहराज्यमंत्री राम शिंदे
By Admin | Updated: September 23, 2015 21:00 IST2015-09-23T18:22:36+5:302015-09-23T21:00:20+5:30
सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत असतानाच संपूर्ण तपासानंतरच सनातनवरील बंदीचा निर्णय घेणार असल्याचे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिले आहे.

पूर्ण तपासानंतरच 'सनातन'वर बंदीचा निर्णय - गृहराज्यमंत्री राम शिंदे
ऑनलाइन लोकमत
पुणे/कोल्हापूर, दि. २३ - सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत असतानाच संपूर्ण तपासानंतरच सनातनवरील बंदीचा निर्णय घेणार असल्याचे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिले आहे. कॉ. पानसरेंच्या हत्याप्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यास राज्य सरकार कमी पडणार नाही असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
कॉ. गोंविद पानसरे यांच्या हत्येप्रकरी सनातन संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाडला अटक झाल्यानंतर राज्यभरातून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी पुण्यात गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. पानसरे हत्याप्रकरणात समीर हा एकमेव संशयित असल्याचे राम शिंदे यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास हा पोलिसांसमोरील सर्वात मोठे आव्हान होते, आता तपासाची दिशा बदलणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण चौकशी झाल्यावर सनातनवरील बंदीचा निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाडला बुधवारी कोल्हापूरमधील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने समीरला २६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत धाडले आहे. समीर व ज्योती कांबळेच्या संभाषणातून पानसरे यांच्या हत्येचा उलगडा झाल्याचे समोर आले असून रुदगौडा पाटीलशी समीरचे संबंध असल्याचा दावाही सरकारी वकीलांनी कोर्टासमोर केला आहे. हत्येच्या दिवशी समीर ठाण्यात होता, गेल्या अनेक महिन्यांपासून समीर व रुद्र एकमेकांच्या संपर्कात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
कोल्हापूरमधील वकिलांनी समीर गायकवाडचे वकीलपत्र घेण्यास नकार दिल्यानंतर सनातनसाठी काम करणा-या २७ वकीलांनी समीरचे वकीलपत्र घेण्याची तयारी दर्शवली आहे.