अखेर त्या भिंतीवर कारवाई
By Admin | Updated: May 21, 2016 03:36 IST2016-05-21T03:36:34+5:302016-05-21T03:36:34+5:30
शिवसेनेचे ग्रामीण भागातील पदाधिकारी सुनील मालणकर यांनी परिवारासह सुरू केलेले उपोषण अखेर शुक्रवारी कारवाई होताच मागे घेण्यात आले.

अखेर त्या भिंतीवर कारवाई
कल्याण : अनधिकृत बांधकामाला अभय मिळत असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे ग्रामीण भागातील पदाधिकारी सुनील मालणकर यांनी परिवारासह सुरू केलेले उपोषण अखेर शुक्रवारी कारवाई होताच मागे घेण्यात आले. तीन दिवस त्यांचे उपोषण सुरू होते.
उपोषणादरम्यान त्यांच्या मुलीसह पत्नीची प्रकृती बिघडली. दरम्यान, मनसेच्या डोंबिवलीतील शिष्टमंडळाने मालणकर यांची भेट घेऊन बांधकामावर कारवाई करण्याबाबत आयुक्त ई. रवींद्रन यांच्याशी चर्चा केली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दूरध्वनी केला होता. त्यानंतर, झालेल्या कारवाईमुळे महापौर राजेंद्र देवळेकर आणि शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत मालणकर परिवाराने उपोषण सोडले. २७ गावांतील देसलेपाडा परिसरातील मालणकर यांच्या दुकानासमोर भिंत बांधली गेल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. अनधिकृत भिंतीवर कारवाई करावी, अशी मागणी ते गेल्या वर्षभरापासून करीत आहेत. महापालिकेने संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याचे जाहीर करून तोडण्याची नोटीसदेखील काढली. मात्र, भिंत न तोडल्याने बुधवारपासून त्यांनी उपोषण सुरू केले. रात्री उशिरा परिवहन सभापती तथा शिवसेनेचे डोंबिवली शहराध्यक्ष भाऊसाहेब चौधरी यांनी मालणकर परिवाराची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
तसेच गुरुवारी महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही मालणकर यांच्याशी चर्चा केली. जोपर्यंत बांधकामावर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा मालणकर परिवाराने घेतला होता. २७ गावे केडीएमसीत समाविष्ट झाली असली तरी त्यांचे नियोजन एमएमआरडीएकडे असल्याने संबंधित बांधकामावर कारवाई करण्याचा अधिकार त्यांना असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले होते. पालिका दिशाभूल करत असल्याचा आरोप मालणकर यांनी केला होता. दरम्यान, मुलीपाठोपाठ शुक्रवारी मालणकर यांच्या पत्नीचीही तब्येत बिघडली. कोकण युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी मालणकर परिवाराची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. दुपारी मनसेच्या शिष्टमंडळाने मालणकर यांची भेट घेतली आणि आयुक्तांशी चर्चा केली. चर्चेदरम्यान आयुक्तांनी उपायुक्त सुरेश पवार आणि प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे यांना संबंधित अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)