अखेर सूरजला ठोकल्या बेड्या

By Admin | Updated: September 20, 2014 01:56 IST2014-09-20T01:56:02+5:302014-09-20T01:56:02+5:30

कारागृहातून पळाल्यानंतर एका महाविद्यालयीन

After all, | अखेर सूरजला ठोकल्या बेड्या

अखेर सूरजला ठोकल्या बेड्या

फरार कैद्याला मूर्तिजापुरात अटक : अपहृत मुलगीही सुखरूप
नागपूर :
कारागृहातून पळाल्यानंतर एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे अपहरण करणाऱ्या कुख्यात सूरज श्याम अरखेल याच्या मुसक्या बांधण्यात सदर पोलिसांनी अखेर यश मिळवले. त्याच्या ताब्यातून अपहृत युवतीचीही पोलिसांनी सोडवणूक केली. कायदेशीर प्रक्रिया आटोपल्यानंतर तिला आज तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. वर्धा येथील एका खुनाच्या प्रकरणात कोर्टाने सूरज अरखेल याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. तो १४ वर्षांपासून कारागृहात शिक्षा भोगत होता. कारागृहातील अधिकाऱ्यांसोबत मधूर संबंध असल्यामुळे सूरजला त्यांनी खुल्या कारागृहात ठेवले होते. त्याला आतबाहेर जाण्याची मुभा होती. त्याचाच गैरफायदा घेत सूरजने १७ सप्टेंबरच्या दुपारी कारागृहातून पळ काढला.
सर्व काही पूर्वनियोजित
कारागृहातून पळ काढण्यापासून तो अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यापर्यंतचा प्लान सूरजने पूर्वीच बनविला होता. याचमुळे कारागृहातून पळण्याच्या अर्धा तासापूर्वी सूरजने आपल्या एका मित्राला फोन केला. त्यानुसार हा मित्र बुधवारी दुपारी १२.३० वाजता कारागृहासमोर आॅटो घेऊन उभा होता. त्या आॅटोत बसून सूरज सदरमध्ये पोहचला. तेथे जीन्स आणि टी शर्ट विकत घेतला. तत्पूर्वी आपल्या अल्पवयीन प्रेयसीला सूरजने संजीवनी स्कूलजवळ बोलवून घेतले. तीसुद्धा शाळेजवळ पोहचली. तेथून हे दोघे आणि आॅटोचालक मित्र असे तिघे सरळ अमरावतीकडे निघाले. अमरावतीला पोहचल्यानंतर त्यांनी चहानाश्ता केला. सूरजने मुलीच्या आईच्या मोबाईलवर फोन केला. ‘मी आणि तुमची मुलगी सोबत असून आम्ही लग्न करणार आहोत. तुम्ही पोलिसांकडे तक्रार करण्याचा खटाटोप करू नका. टेन्शन घेऊ नका‘, असेही सूरजने मुलीच्या आईला सांगितले.
पोलिसांची
व्यूहरचना
आपल्या मुलीचे सूरजने अपहरण केल्याची तक्रार तिच्या पालकांनी बुधवारी सायंकाळी सदर ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून सूरजचा शोध सुरू केला. सूरज कुठे गेला हे माहीत नव्हते. मात्र, त्याने ज्या क्रमांकावरून मुलीच्या आईला फोन केला, तो क्रमांक पोलिसांच्या तपासाचा धागा ठरला. सदरचे ठाणेदार जी. के. राठोड, द्वितीय निरीक्षक राजेंद्र मछिंदर यांनी तपासाची व्यूहरचना केली. पोलिसांचे एक पथक सायबर सेल मध्ये बसले. आरोपी सूरज कुणाकुणाच्या फोनवर संपर्क करीत आहे, त्याचा छडा लावल्या गेला. सूरजची आत्या मूर्तिजापूरला राहाते. तो आपल्या नातेवाईकांसोबत सारखा संपर्क करीत असल्यामुळे सहायक निरीक्षक शिर्के यांच्या नेतृत्वात शिपाई विलास चव्हाण, गणेश (५७७६), अतूल (५५०५) मुलीच्या वडिलांना घेऊन मूर्तिजापूरकडे निघाले होते. तत्पूर्वी ठाणेदार राठोड यांनी मूर्तिजापूर पोलिसांशी संपर्क साधून आरोपीच्या नातेवाईकांचे मोबाईल लोकेशन देऊन त्यांच्यावर नजर ठेवण्यास सांगितले. त्यानुसार, मूर्तिजापूर पोलिसांनी सूरजच्या आत्याचे घर गाठले. सूरज आणि त्याची प्रेयसी तेथे गुरुवारी पहाटे दीड ते दोनच्या दरम्यान पोहचली होती. त्यांना मूर्तिजापूर पोलिसांनी गुरुवारी दुपारी ३ वाजता ताब्यात घेतले आणि सदर पोलिसांना कळविले. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी सदर पोलिसांचे पथक मूर्तिजापूरला पोहचले. त्यांनी तेथील पोलीस ठाण्यात औपचारिकता पार पाडल्यानंतर सूरज आणि त्या मुलीला ताब्यात घेतले. या दोघांना घेऊन पोलीस पथक आज पहाटे नागपुरात पोहचले. आज दुपारी या दोघांचेही मेडिकल करण्यात आले. सूरजचा कोर्टातून पीसीआर मिळवल्यानंतर पीडित मुलीला पोलिसांनी तिच्या पालकांच्या हवाली केले.
प्रशंसनीय कामगिरी
एका कुख्यात गुन्हेगाराच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करण्याची प्रशंसनीय कामगिरी बजावली. त्यामुळे सदर पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. दरम्यान, सूरज आणि त्याच्या प्रेयसीला मूर्तिजापूरपर्यंत नेऊन सोडणाऱ्या ‘आकाश‘ नामक सहआरोपीचा आता पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: After all,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.