आम आदमी पार्टी चर्चेतूनही बाद
By Admin | Updated: October 1, 2014 00:27 IST2014-10-01T00:26:49+5:302014-10-01T00:27:00+5:30
आप पक्षाचे स्थानिक नेते त्यांच्या आवडीचा पक्ष आणि उमेदवारासाठी काम करण्यात व्यग्र.

आम आदमी पार्टी चर्चेतूनही बाद
राजेश शेगोकार / बुलडाणा
लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय राजकारणात खळबळ उडवून देणारी, आम आदमी पार्टी (आप) विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तर नाहीच, पण आता सामान्य नागरिकांच्या चर्चेतूनही बाद झाली आहे. या पक्षाचे स्थानिक नेते, कार्यकर्ते आता त्यांच्या आवडीचा पक्ष आणि उमेदवारासाठी काम करताना दिसत आहेत.
राजकारणात अनेक पक्षांचा उदय होतो व काळाच्या ओघात या पक्षांचा अस्तही तितक्याच झपाटयाने झालेला दिसतो. दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकून आम आदमी पार्टीने सामान्यांच्या आशा आकांक्षा फुलविल्या होत्या. गल्लीबोळातील सामान्य नागरिकांच्या तोंडात अरविंद केजरीवाल यांचे नाव होते; मात्र नंतर दिल्लीची सत्ता सोडण्याचा नाटकी निर्णय आणि लोकसभा निवडणुकीत झालेले पानीपत, या कारणांमुळे विधानसभा निवडणुकीत आपचे अवसान गळाले. या पक्षाने आम्ही विधानसभा लढविणार नाही, असे आधीच जाहीर करून टाकले. हा पक्ष निवडणूक रिंगणातच नसल्याने, आपपक्षाच्या वळचणीला गेलेल्या अनेक नेत्यांनी अन्य पक्षांचा आधार घेतला असून, कार्यकर्ता कोण, हा आता संशोधनाचा विषय झाला आहे.
विधानसभा निवडणुकीनिमित्त सर्वत्र गप्पांचे फड रंगले असून, या गप्पांमध्येही फारशी चर्चा होताना दिसत नाही. अवघ्या काही महिन्यात देशाच्या राष्ट्रीय राजकारणात स्थान मिळवणारी आम आदमी पार्टी लोकसभा निवडणुकीनंतर काही दिवसातच बाद झाली आहे.
** अण्णा हजारे यांच्या भूमिकेविषयी उत्सूकता
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकसभा निवडणुकीत काही निवडक उमेदवारांना पाठींबा दिला होता. या उमेदवारांच्या प्रचारासाठी अण्णांनी राज्यभर सभा घेतल्या आणि त्याची सुरूवात बुलडाण्यातून झाली होती. सिंदखेडराजा येथे अण्णांनी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यातील पहिले भाषण केले होते. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत अण्णांची भूमिका काय राहणार, याबाबत राजकीय क्षेत्रात उत्सूकता आहे. युती आणि महाआघाडी दूंभगल्यामुळे सध्या आयाराम गयाराम प्रवृत्तीच्या नेत्यांनी मिळेल त्या पक्षाची उमेदवारी स्विकारत रिंगणामध्ये उडी घेतली असल्याने अण्णा कोणती भूमिका घेतात, याविषयी राजकीय वतरुळात उत्सूकता आहे.