अखेर ३६ वर्षांनी मिळाला न्याय

By Admin | Updated: November 22, 2014 03:13 IST2014-11-22T03:13:39+5:302014-11-22T03:13:39+5:30

अवघ्या आठ वर्षांचा असताना अपघाताने शारीरिक व्यंग आलेल्या एका मुलाला तब्बल ३६ वर्षांनी उच्च न्यायालयाकडून १ कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसानभरपाई मिळाली आहे़

After 36 years finally got justice | अखेर ३६ वर्षांनी मिळाला न्याय

अखेर ३६ वर्षांनी मिळाला न्याय

अमर मोहिते, मुंबई
अवघ्या आठ वर्षांचा असताना अपघाताने शारीरिक व्यंग आलेल्या एका मुलाला तब्बल ३६ वर्षांनी उच्च न्यायालयाकडून १ कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसानभरपाई मिळाली आहे़
न्या़ राजेश केतकर यांनी हा निकाल आहे़ त्यात आता ४४ वर्षांच्या झालेल्या त्या मुलाला ३९ लाख ९२ हजार रुपये नुकसानभरपाई १९८७पासून ९ टक्के व्याज दराने देण्याचे आदेश न्यायालयाने विमा कंपनीला दिले़ या रकमेतून अपघात दावा न्यायाधिकरणाने दिलेली ४ लाख रुपयांची रक्कम वजा होणार आहे़ त्यामुळे उर्वरित रकमेवर ९ टक्के व्याज मोजल्यास या नुकसानभरपाईची रक्कम १ कोटी रुपयांपेक्षा अधिक होत असल्याचे अ‍ॅड़ तेजपाल इंगळे यांनी सांगितले़
पीडिताचे नाव रूपेश रश्मीकांत शहा असे आहे़ १८ आॅक्टोबर १९७८ रोजी शाळेतून परतताना रूपेशला एका अ‍ॅम्बेसिडर गाडीने धडक दिली़ तेव्हा तो आठ वर्षांचा होता़ मानव मंदिर शाळेतून चर्नीरोड येथील घरी जाताना ब्रिच कॅण्डी रुग्णालयाजवळ हा अपघात झाला़ हा अपघात एवढा भीषण होता की रूपेशच्या मेंदूला जबरदस्त आघात झाला़ या अपघाताने तो कोमामध्ये गेला होता़ याच अवस्थेत सहा महिन्यांनी त्याला रुग्णालयातून घरी आणण्यात आले़
हळूहळू रूपेशच्या प्रकृतीत सुधारणा झाली़ मात्र दैनंदिन कामासाठी त्याला साहाय्यक आवश्यक झाला़ अखेर या अपघाताची नुकसानभरपाई मिळावी म्हणून रूपेशच्या वतीने मोटार अपघात दावा न्यायाधिकरणात दावा दाखल करण्यात आला़ न्यायाधिकरणाने विमा कंपनीला ४ लाख १५ हजारांची नुकसानभरपाई रूपेशला देण्याचे आदेश दिले़ ही रक्कम आयुष्यभरासाठी पुरेशी नसल्याने रूपेशने अ‍ॅड़ तेजपाल इंगळे यांच्यामार्फत याविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले़
न्या़ राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर या अपिलावर सुनावणी झाली़ त्यात अ‍ॅड़ इंगळे यांनी रूपेशला कायमस्वरूपी आलेल्या व्यंगाकडे न्यायालयाचे लक्ष वेधले़ ते म्हणाले, रूपेश अवघा आठ वर्षांचा असताना त्याला अपघात झाला़ यात त्याची काहीच चूक नव्हती़ आता त्याचे वय ४४ वर्षे आहे़ साहाय्यकाशिवाय तो दैनंदिन काम करू शकत नाही़ यामुळे त्याचा विवाहही झाला नाही़ या प्रकरणात अ‍ॅड़ उमेश पवार व अ‍ॅड़ आनंद लांडगे यांनी अ‍ॅड़ इंगळे यांना साहाय्य केले़

Web Title: After 36 years finally got justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.