स्वस्तात कर्ज, होऊ दे खर्च !
By Admin | Updated: September 30, 2015 02:56 IST2015-09-30T02:56:56+5:302015-09-30T02:56:56+5:30
सणासुदीच्या तोंडावर जनतेसाठी एक शुभवर्तमान आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी मांडलेल्या पतधोरणाद्वारे रेपो दरात तब्बल अर्धा टक्क्याची कपात करीत उद्योगांसह सामान्य जनतेला सुखावह धक्का दिला आहे.

स्वस्तात कर्ज, होऊ दे खर्च !
मुंबई : सणासुदीच्या तोंडावर जनतेसाठी एक शुभवर्तमान आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी मांडलेल्या पतधोरणाद्वारे रेपो दरात तब्बल अर्धा टक्क्याची कपात करीत उद्योगांसह सामान्य जनतेला सुखावह धक्का दिला आहे. यामुळे वाहन, गृह यासह विविध प्रकारची कर्जं स्वस्त होणार आहेत.
रिझर्व्ह बँकेने केलेल्या घोषणेनुसार, रेपो दर गेल्या चार वर्षांतील सर्वात कमी म्हणजे ६.७५ टक्के इतका झाला आहे. मात्र सीआरआर व अन्य कोणत्याही दरात कपात केलेली नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेल्या दरकपातीच्या घोषणेनंतर स्टेट बँकेसह देशातील काही प्रमुख बँकांनी आपल्या विविध कर्जांवरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. या दरकपातीचा फायदा सध्या कर्ज असलेल्या व नव्याने कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या अशा दोन्ही घटकांना होईल.
आगामी काळातील दसरा-दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या दरकपातीमुळे प्रामुख्याने बिल्डर, वाहन कंपन्या आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या कंपन्यांकडून ग्राहकांसाठी अधिकाधिक आकर्षक योजना सादर होऊ शकतील. आजच्या दरकपातीचे सरकारसह उद्योगजगताकडून मोठे स्वागत झाले आहे.
चालू वर्षात यापूर्वी जानेवारी, मार्च, जून अशा तीन वेळा प्रत्येकी पाव टक्क्याची कपात करूनही त्याचा फारसा लाभ
बँकांनी ग्राहकांपर्यंत पोहोचू दिला नव्हता. या पार्श्वभूमीवर बँका जोपर्यंत हा लाभ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवित नाहीत तोवर दरकपात न करण्याचे संकेत राजन यांनी
दिले होते. तसेच त्यांच्या अपेक्षेनुसार महागाई नियंत्रणात आल्याशिवायही दरकपात न करण्याच्या मुद्द्यावर राजन ठाम होते.
पंतप्रधान, केंद्रीय वित्तमंत्री, नीती
आयोगाचे अध्यक्ष, उद्योगजगत अशा सर्वांनीच दरकपातीची अपेक्षा वारंवार व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर पाव टक्क्याच्या तुलनेत अर्धा टक्का दरकपात करीत राजन यांनी सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे.
-----------
अपेक्षेपेक्षा जास्त दरकपात केली आहे. तुम्ही सान्ता क्लॉजसारखे आश्चर्यचकित करणारी भेटवस्तू देत आहात, अशी विचारणा राजन यांना पतधोरणासंदर्भातील पत्रकार परिषदेतील केली असता, माहिती नाही, तुम्ही मला काय म्हणता सान्ता क्लॉज किंवा अन्य काही. पण माझे नाव रघुराम राजन आहे आणि मला जे वाटते तेच मी करतो, अशी मार्मिक प्रतिक्रिया राजन यांनी दिली. राजन यांनी पदभार स्वीकारला होता, त्यावेळीदेखील ‘मी गव्हर्नर म्हणून काम करायला आलो आहे, फेसबुकवर लाइक्स वाढवायला आलेलो नाही’, अशीच एक मार्मिक प्रतिक्रिया दिली होती.
---------------
असा होईल फायदा
समजा, एखाद्या व्यक्तीचे १० लाख रुपयांचे २० वर्षं मुदतीसाठीचे गृहकर्ज आहे. सध्या या कर्जाचा व्याजदर १०.५० टक्के इतका आहे. याकरिता त्याला प्रति माह ९,९८४ रुपये इतका हप्ता भरावा लागतो. आजच्या निर्णयानंतर, मासिक
हप्त्यात त्याची ३३४ रुपयांची बचत होईल व त्याचा हप्ता ९,६५० रुपयांवर येईल. वर्षभरात ४,००८ रुपयांची बचत होईल.
---------------
एक लाख कोटींपेक्षा जास्त भांडवल बाजारात
> ज्या दराने रिझर्व्ह बँक देशातील बँकांना कर्ज देते, त्या दराला रेपो रेट असे म्हणतात.
> ही पाव टक्का कपात झाल्यास किमान ५० हजार कोटी रुपये निधी बँकांच्या हाती उपलब्ध होतात.
>राजन यांनी अर्धा टक्का कपात केल्याच्या पार्श्वभूमीवर किमान एक लाख कोटी रुपये बँकांकडे उपलब्ध होतील.
------------
आता चेंडू सरकारच्या कोर्टात
सरकारच्या आणि उद्योगजगताच्या अपेक्षेपेक्षा एक पाऊल पुढे टाकत राजन यांनी व्याजदरात कपात केल्यानंतर अर्थव्यवस्थेला गती देण्याचा चेंडू त्यांनी सरकारच्या कोर्टात टाकला. -वृत्त/७
------------
रिझर्व्ह बँकेने केलेल्या दरकपातीमुळे अर्थकारणात गती निर्माण होण्यास मदत होईल.
- अरुण जेटली