कौतुकाला लालफितशाहीचा फटका!
By Admin | Updated: August 27, 2014 01:02 IST2014-08-27T01:02:25+5:302014-08-27T01:02:25+5:30
जनगणनेसारख्या राष्ट्रीय कामात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जाहीर झालेले पदक गत सहा महिन्यांपासून प्राप्त झाल्यावरही संबंधित कर्मचाऱ्यास सन्मानपूर्वक प्रदान करून त्याचा गौरव करण्याचे सौजन्यही

कौतुकाला लालफितशाहीचा फटका!
उत्कृष्ट कामगिरी : पदक जाहीर होऊनही प्रदान केले नाही
चंद्रशेखर बोबडे - नागपूर
जनगणनेसारख्या राष्ट्रीय कामात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जाहीर झालेले पदक गत सहा महिन्यांपासून प्राप्त झाल्यावरही संबंधित कर्मचाऱ्यास सन्मानपूर्वक प्रदान करून त्याचा गौरव करण्याचे सौजन्यही स्थानिक महसूल प्रशासनाने न दाखविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विशेष म्हणजे, गत २६ जानेवारीलाच या पदकाचे सन्मानपूर्वक वाटप करायचे होते. पण प्रशासकीय हेवेदाव्यामुळे ते होऊ शकले नाही. यावेळी १५ आॅगस्टचा मुहूर्त ठरला. पण दोनपैकी एकाच अधिकाऱ्याला ते देण्यात आले. कर्मचाऱ्याचे कौतुक करतानाही प्रशासनाने आखडता हात घेतल्याने नाराजीचे सूर उमटले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०११ च्या राष्ट्रीय जनगणनेत सर्वात चांगले काम नागपूर जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याबद्दल जनगणना संचालनालयाच्या केंद्रीय कार्यालयाने या कामगिरीसाठी २०१३-१४ या वर्षात ५६ कर्मचाऱ्यांची विशेष पदकासाठी निवड केली होती. यात तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदार, शिक्षक आणि इतरही कर्मचाऱ्यांचा समावेश होता. जानेवारीत ही पदके जिल्हा कार्यालयाला प्राप्त झाली होती. ती २६ जानेवारीला वाटप करायची होती. ग्रामीण भागातील पदके त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी विशेष कार्यक्रम घेऊन ती सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. नागपुरातील दोन पदकांचे वाटप गणतंत्रदिनी करायचे होते. ही दोन पदके तत्कालीन उपनिवासी जिल्हाधिकारी प्रमोद भुसारी आणि तहसीलदार मनोहर पोटे यांना जाहीर झाली होती. पण प्रशासकीय हेवेदावे आड आले आणि पदकाचे वाटप टाळण्यात आले. ही पदके जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली.