दुष्काळामुळे अंधेरी दफनभूमीचा पाणी शिंपडण्याची प्रथा टाळण्याचा सल्ला
By Admin | Updated: March 22, 2016 12:32 IST2016-03-22T12:23:22+5:302016-03-22T12:32:58+5:30
कबरीवर पाणी शिंपडल्यानंतर मृत व्यक्तीच्या आत्म्याची दु:ख, वेदनांमधून सुटका होते असे मुस्लिम समाजामध्ये काहीजण मानतात.

दुष्काळामुळे अंधेरी दफनभूमीचा पाणी शिंपडण्याची प्रथा टाळण्याचा सल्ला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - कबरीवर पाणी शिंपडल्यानंतर मृत व्यक्तीच्या आत्म्याची दु:ख, वेदना, नरकयातनांमधून सुटका होते असे मुस्लिम समाजामध्ये काहीजण मानतात. त्यामुळे मुस्लिम धर्मामध्ये व्यक्तीच्या मृत्यूनंतर नातेवाईक कबरीवर जाऊन पाणी शिंपडतात. मुंबईमध्ये सध्या काही भागांमध्ये पाणी टंचाई आहे.
त्यामुळे अंधेरी चार बंगला येथील मुस्लिम कबरस्तान ट्रस्टच्या विश्वस्तांनी दफनभूमीमध्ये मोठा फलक लावून कबरीवर पाणी टाकण्याची प्रथा टाळण्याचा सल्ला दिल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. इस्लाममध्ये या प्रथेला आधार नसल्याचे त्यांनी फलकावर लिहीले आहे. मशिदीला लागून असलेल्या चारबंगला येथील या दफनभूमीमध्ये पंधराशे ते सोळाशे कबरी आहेत. प्रसिद्ध ऊर्दू कवी कैफी आझमी आणि अभिनेता फारुख शेख यांच्यावर याच दफनभूमीत अंत्यसंस्कार झाले.
दफनभूमीत प्रवेशव्दाराजवळ पाण्याचे डब्बे ठेवले आहेत. दफनभूमीत प्रवेश केल्यानंतर मृतांचे नातेवाईक डब्ब्यांमध्ये पाणी भरुन शिंपडण्यासाठी कबरीवर नेतात. पाणी टंचाईची कल्पना यावी यासाठी दफनभूमीत हा फलक लावला आहे. विश्वस्तांना महापालिकेने कोणतीही विनंती केलेली नाही. त्यांनी स्वेच्छेने पाणी टंचाईची जाणीव ठेऊन हा फलक लावला आहे. सध्या पाणी जपून वापरणे गरजेचे आहे असे विश्वस्तांनी सांगितले.