पंतप्रधानांचा फोटो वापरून जाहिरात
By Admin | Updated: April 28, 2016 03:30 IST2016-04-28T03:30:55+5:302016-04-28T03:30:55+5:30
पंतप्रधान जनआवास योजना देशात राबविली जात असून गोरगरीब जनतेसाठी काही लाखाची सबसिडी देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवित आहे.

पंतप्रधानांचा फोटो वापरून जाहिरात
कर्जत : पंतप्रधान जनआवास योजना देशात राबविली जात असून गोरगरीब जनतेसाठी काही लाखाची सबसिडी देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवित आहे. असे असताना कर्जत तालुक्यात प्रकल्प असलेल्या एका बिल्डरने थेट पंतप्रधान मोदी यांचे फोटो असलेली जाहिरात करून जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल महाराष्ट्र भाजपाने घेतली असून नेरळ पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्र ार दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पुण्यातील मंत्री हाऊस येथे मुख्य कार्यालय असलेल्या एक्स्झर्बिया डेव्हलपर्सचे कर्जत तालुक्यात तीन बांधकाम प्रकल्प आहेत. त्यांनी गुढीपाडवा काळात घरे घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांना आकर्षित करण्यासाठी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर आणि कर्जत -कल्याण राज्यमार्ग तसेच कर्जत तालुक्यातील अन्य प्रमुख रस्त्यावर मोठे जाहिरात फलक जागोजागी लावले होते .त्या जाहिरात फलकावर ठळकपणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो झळकत होते.
रायगड जिल्हा भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि माजी जिल्हा उपाध्यक्ष नितीन कांदळगावकर यांनी अशा प्रकारच्या जाहिरातीबाबत राज्य भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्याशी संपर्क साधून ही बाब सांगितली. भंडारी यांनी आपण कोणत्याही बिल्डरला पंतप्रधान अथवा राज्याचे मुख्यमंत्री यांचे फोटो लावण्याची परवानगी दिली नाही. तसेच तशी परवानगी पीएमओ कार्यालय देत असते, त्यामुळे बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची सूचना करण्यात आली.
त्यानंतर भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य नितीन कांदळगावकर यांनी नेरळ पोलीस स्टेशनमध्ये तक्र ार दिली.(वार्ताहर )