‘एव्हीएम’मध्ये फेरफारसाठी दिलेला अॅडव्हान्स परत केला
By Admin | Updated: March 4, 2017 05:30 IST2017-03-04T05:30:46+5:302017-03-04T05:30:46+5:30
मतदान यंत्रामध्ये (एव्हीएम) फेरफार करुन देतो आणि तुमचे उमेदवार निवडून आणतो असे सांगणाऱ्याचे बिंग फोडण्यासाठी आपण त्याला अॅडव्हान्स दिला

‘एव्हीएम’मध्ये फेरफारसाठी दिलेला अॅडव्हान्स परत केला
अतुल कुलकर्णी,
मुंबई- विदर्भातील एका शहरात मतदान यंत्रामध्ये (एव्हीएम) फेरफार करुन देतो आणि तुमचे उमेदवार निवडून आणतो असे सांगणाऱ्याचे बिंग फोडण्यासाठी आपण त्याला अॅडव्हान्स दिला; पण आम्ही दुसऱ्याची सुपारी घेतली आहे असे सांगत त्या व्यक्तीने दिलेले पैसे परत आणून दिले, अशी धक्कादायक माहिती एका ज्येष्ठ माजी मंत्र्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत दिल्याचे समजते.
गेले काही दिवस राज्यात ‘एव्हीएम’ वरुन जोरदार चर्चा सुरु झाली आहे. काहीजण न्यायालयातही गेले आहेत. पिंपरी चिंचवड आणि पुण्यात राष्ट्रवादीला मिळालेले अपयश आणि काही हक्काच्या जागा पडल्यावरुन बैठकीत ही चर्चा सुरु झाली. पुण्यात संजय काकडे यांनी भाजपा ९२ जागा जिंकणार असे आदल्या दिवशी जाहीर केले आणि त्यांना नेमक्या तेवढ्याच जागा मिळाल्या. काकडे यांनी पुण्यातल्या राजकारणाचा एवढा अभ्यास कधी केला, असा तिरकस सवालही यावेळी एका नेत्याने उपस्थित केला.
विदर्भात राष्ट्रवादीच्या एका माजी मंत्र्यांकडे तुम्ही सांगाल ते नगरसेवक आम्ही एव्हीएममध्ये फेरफार करुन निवडून आणू असे एकाने सांगितले. त्याचे बिंग फोडण्यासाठी म्हणून त्यांनी जेवढे पैसे मागितले ते मान्य करुन त्यापोटी काही रक्कम अॅडव्हान्सही दिली गेली, पण दोन तीन दिवसांनी तो माणूस परत आला व आम्ही इथे भाजपाचे काम घेतले आहे. तुमचे करता येणार नाही. येथे काँग्रेस, राष्ट्रवादीचे काम करायचे नाही अशा सूचना आहेत असे सांगून त्याने घेतलेला अॅडव्हान्स परत केला, असा दावाही त्या माजी मंत्र्याने बैठकीत केल्याचे समजते. त्यावर शरद पवार यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणावर यात काही होऊ शकते याविषयी आपल्या मनात शंका असल्याचे सांगितल्याचे एका नेत्याने सांगितले.
२५ जिल्हा परिषदांमधील पक्षीय बलाबल पहाता सत्ता स्थापनेसाठी काय करायचे याचा आढावाही यावेळी घेतला गेला. जर राष्ट्रवादी आणि भाजपा अशी आघाडी झाली तर २५ पैकी १८ जिल्हा परिषदांमध्ये आपली सत्ता येऊ शकते अशी आकडेवारी बैठकीत दिली गेली. दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या तर आठ जागी सत्ता येऊ शकते अशी आकडेवारी यावेळी सांगण्यात आली. मात्र भाजपासोबत जायचे नाही अशी भूमिका खा. पवार यांनी मांडल्याचे सुत्रांनी सांगितले.
मात्र, जिल्हापरिषदांसाठी कोणत्या पक्षासोबत जायचे याचे सगळे निर्णय स्थानिक पातळवरील राजकीय समिकरणे तपासूनच घेतले जावे, त्यासाठीचे सगळे अधिकार त्या त्या जिल्ह्याच्या नेत्यांना आणि ते जिल्हे ज्यांना निरीक्षक म्हणून दिले होते त्यांना विश्वासात घेऊन करावेत असेही या बैठकीत ठरल्याचे सांगण्यात आले. उद्या परत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. परदेशी असल्यामुळे अजित पवार आजच्या बैठकीत उपस्थित नव्हते.
दरम्यान, रात्री उशिरा दोन्ही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली. त्या बैठकीस खा.अशोक चव्हाण, सुनील तटकरे, माणिकराव ठाकरे, मुंडे यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील, नारायण राणे, दिलीप वळसे पाटील आदींची उपस्थिती होती व त्यात अधिवेशनातल्या फ्लोअर मॅनेजमेंट आणि जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर चर्चा झाली.