प्रशासनाने लोटले, दारूचे दुकान थाटले
By Admin | Updated: November 18, 2014 00:58 IST2014-11-18T00:58:52+5:302014-11-18T00:58:52+5:30
गरीब अपंगांच्या उद्धारासाठी मायबाप सरकारने अनेक योजना आखल्या आहेत़ या योजनांच्या शुभारंभांची देखणी छायाचित्रे वृत्तपत्रात सातत्याने झळकत असतात़ परंतु ज्यांच्यासाठी या योजना आहेत त्यांना मात्र

प्रशासनाने लोटले, दारूचे दुकान थाटले
प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध : केरोसिन परवाना बदलण्यासाठी सहा वर्षांपासून पायपीट
नागपूर : गरीब अपंगांच्या उद्धारासाठी मायबाप सरकारने अनेक योजना आखल्या आहेत़ या योजनांच्या शुभारंभांची देखणी छायाचित्रे वृत्तपत्रात सातत्याने झळकत असतात़ परंतु ज्यांच्यासाठी या योजना आहेत त्यांना मात्र याचा लाभ मिळवण्यासाठी प्रदीर्घ संघर्ष करावा लागतो अन् तरीही शेवटी निराशाच पदरी पडते़ गजानन काळे या अपंग व्यक्तीलाही असाच कटू अनुभव आला़ परंतु कधीतरी पाषाणहृदयी प्रशासनाला पाझर फुटेल या अपेक्षेने तो तब्बल सहा वर्षे सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत राहिला अन् अखेर आज त्याच्या संयमाचा बांध फुटला़ अन् गजाननने पत्नी, मुलासह थेट दारूविक्रीचा निर्णय घेतला आणि दारूचे दुकान थाटले तेही अन्न पुरवठा अधिकाऱ्याच्या कक्षापुढे.
आता त्याच्या या कृतीची वेगवेगळ्या अंगाने चर्चा होत असली तरी गजाननला हे पाऊल का उचलावे, लागले हे जास्त महत्त्वाचे आहे़ गिट्टीखदान, आझादनगर येथील गजानन विठ्ठल काळे हा दोन्ही पायांनी अपंग आहे. आई, पत्नी आणि तीन मुलांची जबाबदारी त्याच्यावर आहे. शासनाने अपंगांना स्वावलंबी बनविण्यासाठी केरोसिनचे परवाने वाटप केले. यासाठी गजानन यानेही अर्ज केला. त्यासाठी ३० ते ४० हजार रुपये खर्च करून परवाना मिळ्विला.
मात्र त्याला मिळालेला परवाना हा पांढऱ्या केरोसिनचा आहे. या केरोसिनचा वापर फुड इंडस्ट्री व मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये होतो. मात्र या केरोसिनचा डिस्ट्रिब्युटर जिल्ह्यात नाही. त्यामुळे परवाना मिळूनही त्याला केरोसिनचा कोटा मिळत नाही. त्यामुळे पांढऱ्या केरोसिनचा परवाना निळ्या केरोसिनमध्ये बदल करावा, अशी मागणी गजानन यांनी अन्न पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली. यासंदर्भात त्याने मुख्यमंत्र्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत निवेदने दिली. अन्न पुरवठा कार्यालयाच्या चकरा मारून मारून काहीच तोडगा निघत नसल्याने त्याने थेट अन्न पुरवठा अधिकाऱ्याच्या कक्षापुढे पत्नी व मुलांसह देशी दारूचे दुकान थाटले. केरोसिनचा कोटा द्या, अन्यथा दारू विक्रीला परवानगी द्या, अशी त्याची मागणी आहे़ (प्रतिनिधी)
अधिकाऱ्याने कुलूप लावून पळवाट शोधली
दुपारी १ वाजतापासून त्याने हे निषेध आंदोलन सुरू केले़ मात्र निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांनी त्याची कुठलीही दखल घेतली नाही. उलट कार्यालयाला कुलूप लावून, मिटिंग असल्याचे कारण सांगून पळवाट शोधली़ शासनाच्या उरफाट्या धोरणाचा फटका बसलेला गजानन एकटा नाही़ राज्यात असे हजारो गजानन आहेत़ त्या सर्वांनीही आपल्या लेकरा-बाळांच्या उदरनिर्वाहासाठी दारूचे दुकान थाटावे असे प्रशासनाला वाटते का, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे़