आदिवासी योजनेतील भ्रष्टाचार नष्ट करणार

By Admin | Updated: November 16, 2014 00:48 IST2014-11-16T00:48:02+5:302014-11-16T00:48:02+5:30

शासनातर्फे आदिवासींच्या योजनेवर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. परंतु हा पैसा कुठे जातो हा गंभीर प्रश्न आहे. यापुढे असे चालणार नाही. आदिवासी योजनांमधील भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यात येईल.

Adivasi plan to eradicate corruption | आदिवासी योजनेतील भ्रष्टाचार नष्ट करणार

आदिवासी योजनेतील भ्रष्टाचार नष्ट करणार

मुख्यमंत्र्यांची घोषणा : ‘मॉनिटरी सिस्टीम’ लागू करणार
नागपूर : शासनातर्फे आदिवासींच्या योजनेवर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. परंतु हा पैसा कुठे जातो हा गंभीर प्रश्न आहे. यापुढे असे चालणार नाही. आदिवासी योजनांमधील भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यात येईल. योजनेत पारदर्शकता आणली जाईल. त्यासाठी योजना राबविताना ‘मॉनिटरी सिस्टीम’ लागू केली जाईल. इतकेच नव्हे तर आदिवासींचा पैसा हा आदिवासींपर्यंतच पोहोचविला जाईल. जो अधिकारी कर्मचारी आदिवासींचा पैसा त्यांच्यापर्यंत पोहचू देणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, त्यासाठी कठोर कायदे केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
क्रांतिसूर्य भगवान वीर बिरसा मुंडा जयंतीनिमित्त मुल निवासी सुधार महासंघद्वारा फुटाळा चौक येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांना बिरसा मुंडा यांचे प्रतीक म्हणून तीर कमान असलेले स्मृतिचिन्ह भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
माजी महापौर व भाजपा आदिवासी आघाडीच्या राष्ट्रीय सचिव माया इवनाते या अध्यक्षस्थानी होत्या. महापौर प्रवीण दटके, आ. सुधाकर देशमुख, आ. डॉ. मिलिंद माने, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, कृष्णराव चव्हाण, नवनितसिंग तुली, मनपा आयुक्त श्याम वर्धने, चिंतामण इवनाते आदी व्यासपीठावर होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बिरसा मुंडा यांनी अतिशय अल्पकाळात आदिवासींसाठी मोठे काम केले. ज्या काळात जमिनदार आणि इंग्रज अशा दोन्ही बाजूंनी आदिवासींची पिळवणूक सुरु होती, त्या काळात बिरसा मुंडा यांनी लढा उभारला. तो लढा खऱ्या अर्थाने आदिवासींचा मुक्तीचा लढा होता. बिरसा मुंडा यांनी दिलेला लढा आणि संघर्षातून आदिवासींना त्यांचे हक्क मिळाले. वनजमिनीवर आदिवासींचा कायद्याने हक्क आहे. परंतु हा हक्क केवळ कागदावरच शिल्लक होता. परंतु आपण त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. आदिवासी योजना आदिवासींपर्यंत प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच बिरसा मुंडा यांनी सुरू केलेला मुक्तीचा लढा आदिवासींनी पुन्हा सुरू करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी आ. सुधाकर देशमुख यांनी आदिवासींसाठी बिरसा मुंडा यांच्या नावाने नागपुरात समाजभवनासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. माया इवनाते यांनीसुद्धा जागेची मागणी करीत बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी सार्वजनिक सुटी जाहीर करण्याची विनंती केली.
अमित कोवे यांनी प्रास्ताविक केले. संचालन संजय बंगाले यांनी केले. नगरसेवक परिणय फुके, श्रीकांत देशपांडे, सुरेंद्र सावरकर, अ‍ॅड. मनिराम मडावी, पंकज आत्राम, कृष्णराव परतेकी, राजमाता राजेश्वरी देवी आदी व्यासपीठावर होते. (प्रतिनिधी)
बिरसा मुंडा यांच्या नावावर नागपुरात समाजभवन
आदिवासी समाजासाठी नागपुरात बिरसा मुंडा यांच्या नावावर समाजभवन उभारण्यात येईल. त्यासाठी मनपाने जागेचा शोध घ्यावा. त्यासंबधीचा प्रस्ताव मनपाने शासनाला पाठवावा शासन लगेच मंजुरी प्रदान करेल. तसेच बिरसा मुंडा यांचे चरित्र हे अतिशय प्रेरणादायी आहे, त्यामुळे ते शालेय स्तरावर उपलब्ध करण्यात येईल. यासाठी आपण स्वत: शिक्षणमंत्र्यांना सांगू, असे आश्वासनसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

Web Title: Adivasi plan to eradicate corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.