आदित्य ठाकरेंनी घेतले श्री राजराजेश्वराचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2022 12:34 IST2022-11-07T12:25:42+5:302022-11-07T12:34:38+5:30
Aditya Thackeray : युवा सेनेचे प्रमुख व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

आदित्य ठाकरेंनी घेतले श्री राजराजेश्वराचे दर्शन
अकोला: संवाद यात्रेनिमित्त अकोल्यात आलेले युवा सेनेचे प्रमुख व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी शिवसैनिकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. आदित्य ठाकरे यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जावून राजराजेश्वराला पुष्पहार अर्पण केला आणि दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार नितीन देशमुख उपस्थित होते.
बाळापूर येथे होणार असलेल्या जाहीर सभेला जाण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी राजराजेश्वराचे दर्शन घेतले व नंतर ते बाळापूरला रवाना झाले.
संवाद यात्रेनिमित्त सकाळी ११ वाजता शिवणी विमानतळावर त्यांचे आगमन झाले. यावेळी शिवसैनिकांनी जय भवानी...जय शिवाजी अशा घोषणा देत, जोरदार शक्तीप्रदर्शन केले. विमानतळावर हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली. विमानतळाबाहेरही शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंचे जोरदार स्वागत केले. शहरात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सोमवारी नियोजित अकोला दौरा असल्याने, त्यांचे विमानाने सकाळी शिवणी विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पासेस असलेल्या शिवसैनिकांनाच विमानतळाच्या आत सोडण्यात येत होते. विमानतळ परिसर व समोर हजारो शिवसैनिक आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी जमले होते. विमानतळावर आदित्य यांचे आगमन झाल्यावर शिवसेनेचे संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार नितीन देशमुख, सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथाेड, जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, मंगेश काळे, श्रीरंग पिंजरकर, राहुल कराळे, देवश्री ठाकरे, शुभांगी किनगे, अकोटच्या माजी नगराध्यक्ष डॉ. मनिषा मते, प्रा. प्रकाश डवले, मनिष मोहोड, अक्षय खुमकर आदींनी त्यांचे स्वागत केले. विमानतळाच्या बाहेर आदित्य ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा आल्यावर, जमलेल्या हजारो शिवसैनिकांना, त्यांनी कारमधून बाहेर येत अभिवादन केले. हस्तांदोलन करीत, त्यांचे स्वागत स्विकारले.