अभिभाषण सभापटलावर मांडलेच नाही
By Admin | Updated: March 10, 2015 04:03 IST2015-03-10T04:03:37+5:302015-03-10T04:03:37+5:30
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत केलेल्या अभिभाषणाचा अधिकृत लेखी तर्जुमा सभापटलावर ठेवण्यात आला नाही.

अभिभाषण सभापटलावर मांडलेच नाही
मुंबई : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत केलेल्या अभिभाषणाचा अधिकृत लेखी तर्जुमा सभापटलावर ठेवण्यात आला नाही. परिणामी अभिभाषणाबद्दल आभारप्रदर्शक ठरावही मांडला गेला नाही.
एरवीच्या प्रथेप्रमाणे राज्यपालांचे अभिभाषण झाले की विधिमंडळ सचिवालयाकडून त्याच्या प्रती लगेच आमदार व पत्रकारांना उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु सोमवारच्या अभिभाषणाची प्रतच सभापटलावर न ठेवल्याने विधिमंडळ सचिवालय हे सविस्तर भाषण वितरित करू
शकले नाही. नेहमीप्रमाणे छापील
प्रत मिळेल या अपेक्षेने अभिभाषण सुरु असताना त्यातील मुद्द्यांची टिपणे न घेतलेल्या पत्रकारांची अडचण झाली. परंतु संध्याकाळी राजभवनावरून अभिभाषणाची प्रत प्रसिद्धी माध्यमांना पाठविण्यात आली. राज्यपालांचे अभिभाषण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून थेट प्रक्षेपित केले गेले.
विधानमंडळ सचिवालयाच्या सूत्रांनी सांगितले की, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सोमवारी फक्त माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील आणि इतर दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण करण्याचाच विषय आणण्याचे ठरले होते. त्यामुळे राज्यपालांच्या अभिभाषणासंबंधी आभार प्रदर्शक प्रस्ताव मांडण्यात आला नाही.
सूत्रांनी हेही स्पष्ट केली असे पहिल्यांदाच घडलेली नाही. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या शोकप्रस्तावावेळीही असे घडले होते. आता राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शक प्रस्ताव मंगळवारी सभागृहात मांडण्यात येणार आहे.
(विशेष प्रतिनिधी)