प्रवाशाबरोबरच रेल्वे पोलिसांवर चोरांचा हल्ला
By Admin | Updated: June 11, 2015 02:06 IST2015-06-11T02:06:49+5:302015-06-11T02:06:49+5:30
प्रवाशाबरोबरच रेल्वे पोलिसांवरही (आरपीएफ) चोरांनी चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री भार्इंदर स्थानकात घडली

प्रवाशाबरोबरच रेल्वे पोलिसांवर चोरांचा हल्ला
मुंबई : प्रवाशाबरोबरच रेल्वे पोलिसांवरही (आरपीएफ) चोरांनी चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री भार्इंदर स्थानकात घडली. यात प्रवासी आणि दोनपैकी एक रेल्वे पोलीस जखमी झाले. तरीही रेल्वे पोलिसांनी यात शिताफीने तीन चोरांना अटक केली.
मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास भार्इंदर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर सुधीर मोरे ट्रेनची वाट पाहात होते. त्या वेळी प्लॅटफॉर्मवरील बँचवर बसल्यावर त्यांना अचानक डोळा लागला. हीच संधी साधत त्यांच्या शेजारी उभे असलेल्या तीन चोरांनी त्यांच्या खिशातून मोबाइल आणि पर्स काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी मोरे यांना जाग येताच त्यांनी चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरांनी त्यांच्याकडून मोबाइल आणि पर्स हिसकावून घेण्यासाठी झटापट सुरू केली. या झटापटीत तीन चोरांपैकी एकाने मोरे यांच्या उजव्या कोपऱ्यावर चाकूने वार केला. यानंतर मोरे यांनी आरडाओरड सुरू करीत रेल्वे पोलिसांकडे (आरपीएफ) मदत मागितली. यासाठी त्यांनी फोनही केला. त्या वेळी ड्युटीवर असलेले आरपीएफचे उपनिरीक्षक भरतलाल, हेड कॉन्स्टेबल सुशील आणि कॉन्स्टेबल बालूप्रसाद हे घटनास्थळी पोहोचेले. त्यांनी पळणाऱ्या चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. यात एका चोराला रेल्वे पोलिसांनी पकडले. आपल्या सहकाऱ्याला पकडल्याचे पाहताच अन्य दोन चोर हे त्याला सोडविण्यासाठी आले आणि त्यांनी कॉन्स्टेबल बालूप्रसाद यांच्या उजव्या कोपरावर तर दुसऱ्या कॉन्स्टेबलच्या डाव्या हातावर चाकूने वार केले. तरीही अशा परिस्थितीत या सर्व चोरांना रेल्वे पोलिसांनी पकडून ठेवले आणि त्यानंतर अन्य रेल्वे पोलिसांशी संपर्क करून मदत मागवून तीन चोरांना जीआरपीच्या ताब्यात दिल्याचे पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.