व्यसनी कैद्याचा कारागृहात हैदोस !
By Admin | Updated: January 18, 2015 00:38 IST2015-01-18T00:38:00+5:302015-01-18T00:38:00+5:30
नशेत बेभान झालेल्या एका कैद्याने मध्यवर्ती कारागृहात हैदोस घातला. कैद्यांना, बावा (रक्षक) आणि कर्मचाऱ्यांनाही त्याने मारहाण केली.

व्यसनी कैद्याचा कारागृहात हैदोस !
नरेश डोंगरे - नागपूर
नशेत बेभान झालेल्या एका कैद्याने मध्यवर्ती कारागृहात हैदोस घातला. कैद्यांना, बावा (रक्षक) आणि कर्मचाऱ्यांनाही त्याने मारहाण केली. तत्पूर्वी त्यान तेथील अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर आरोप केले. त्याचा गोंधळ असह्य झाल्यामुळे अन्य कैद्यांनी त्याला जबर मारहाण केली. येथील मध्यवर्ती कारागृहात घडलेले हे थरारनाट्य संबंधित अधिकाऱ्यांनी पाच-सात दिवस अंधारात ठेवले हे उल्लेखनीय!
नागपूरचे मध्यवर्ती कारागृह अनेक वादग्रस्त घटनांमुळे वर्षभरात राज्यभर चर्चेला आले आहे. या कारागृहात चिकन, मटणच नव्हे, तर दारू, गांजासारखे अमली पदार्थही सहज उपलब्ध होतात. प्रतिबंध असूनही मोबाइलचा सर्रास वापर होतो. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ‘अर्थपूर्ण कार्यपद्धतीमुळे’ काही कैद्यांना घरच्यासारख्याच सोयीसुविधा मिळतात. त्यामुळे इतर कैद्यांचा तिळपापड होतो. यातून कैद्यांचे एकमेकांशी वाद होतात. तुरुंगातील कर्मचाऱ्यांशी वाद, एकमेकांवर हल्ले असे प्रकार नेहमीच घडतात.
अशाच पैकी अमली पदार्थाची सुविधा मिळवणारा एक कैदी गेल्या आठवड्यात जास्त नशेमुळे बेभान झाला. त्याने प्रारंभी आजूबाजूच्या कैद्यांसह आतील रक्षक आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत धमकावणे सुरू केले, काहींना मारहाणही केली.
उपस्थित अधिकाऱ्याकडे त्याची तक्रार झाली. त्यामुळे ‘त्या’ अधिकाऱ्याने त्याला चौकशीसाठी आपल्या कक्षात बोलावून घेतले. येथे या कैद्याने अधिकाऱ्यावरच तोंडसुख घेतले. नको ते आरोप लावले. परिणामी वातावरण तापले. काहींनी त्याला तेथून खेचतच बरॅककडे नेले. त्यामुळे हा कैदी चवताळला. त्याने कैद्यांसोबतच कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. समजवायला येणाऱ्या प्रत्येकाला तो मारहाण करू लागला. त्यामुळे संतप्त होऊन सर्वांनी या कैद्याला बेदम मारहाण केली.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर कारागृहाचे अधिकारी धावले अन् त्यांनी मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून त्याला सोडविले. नंतर त्याच्यावर आतमध्येच उपचार करण्यात आले.
बेदम मारहाणीमुळे चार-पाच दिवस होऊनही जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या या कैद्याच्या अंगावरची विशेषत: हातावरची सूज कमी झाली नाही. उद्या अडचण
होऊ नये, यासाठी कारागृह प्रशासनाने
या घटनेची किरकोळ स्वरूपात कागदोपत्री नोंद केली.