अटकेचे तीव्र पडसाद
By Admin | Updated: March 16, 2016 08:36 IST2016-03-16T08:36:58+5:302016-03-16T08:36:58+5:30
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अटकेचे विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात जोरदार पडसाद उमटले.भुजबळ यांना सक्त वसुली

अटकेचे तीव्र पडसाद
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अटकेचे विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात जोरदार पडसाद उमटले.भुजबळ यांना सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) सूडबुद्धीने अटक केल्याचा आरोप करीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी आज विधानसभा अक्षरश: डोक्यावर घेतली. प्रचंड गदारोळामुळे कामकाज चारवेळा तहकूब करण्यात आले. तर अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव नाकारल्याने विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीत माजी वित्तमंत्री जयंत पाटील यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच भुजबळांच्या अटकेचा विषय उपस्थित केला. ते म्हणाले, भुजबळ तपासाला सहकार्य करीत असतानाही त्यांना सूडबुद्धीने अटक करण्यात आली. भुजबळ यांची चौकशी सुरू असतानाच भाजपाचे एक खासदार त्यांना अटक होणार असल्याचे छातीठोकपणे सांगत होते. याचा अर्थ ही अटक पूर्वनियोजित होती, असा हल्लाबोल करत चर्चेची मागणी पाटील यांनी केली.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुजबळांच्या अटकेपूर्वी ईडीने अध्यक्षांची परवानगी घेतली होती का, असा सवाल केला. त्यांनी आरोप केला की भुजबळ यांच्यावरील कारवाईला राज्य सरकारने अप्रत्यक्ष खतपाणी घातले. सूडबुद्धीने झालेली ही कारवाई निषेधार्ह असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणी चर्चेची मागणी केली. मात्र, अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी तीअमान्य केली. (विशेष प्रतिनिधी)
घोटाळेबाजांना सोडणार नाही - मुख्यमंत्री
आपले सरकार कोणाविरुद्ध सुडाच्या भावनेने वागणार नाही, पण घोटाळ्यांमध्ये अडकलेल्या घोटाळेबाजांना सोडणारही नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ठणकावून सांगितले. विरोधक कामकाजावर बहिष्कार टाकून सभागृहाबाहेर जात असतानाच मुख्यमंत्री उभे राहिले. भुजबळांच्या अटकेसंदर्भात सभागृहात चर्चाच होऊ शकत नाही, असे सांगत ते म्हणाले, भुजबळ यांना अटक केल्याची माहिती सक्त वसुली संचालनालयाने विधानसभेच्या अध्यक्षांना नियमाप्रमाणे कळविली आहे. हे संचालनालय एक स्वायत्त संस्था आहे. मनी लॉँडरिंगच्या प्रकरणात त्यांच्याकडून गेले काही दिवस भुजबळ यांची चौकशी सुरु होती. त्यात जे काही आढळले त्याच्या आधारे मनीलाँडरिंग अॅक्टच्या कलम १९(१) नुसार भुजबळांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तपास यंत्रणेला मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे ही कारवाई झालेली असताना या यंत्रणेवर आणि न्याय व्यवस्थेवर दबाव टाकणे योग्य आहे का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. मनी लाँडरिंग केले असेल तर सक्त वसुली संचालनालयाने मूग गिळून बसायचे का? आमचे सरकार घोटाळा दाबण्यासाठी मदत करू शकत नाही. घोटाळे झाले असतील तर कारवाई होईलच, असे ते हणाले.
नाशिकमध्ये वाहतूक विस्कळीत
नाशिक शहरासह मालेगाव, येवला, सटाणा, कळवण, लासलगावसह जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आल्याने जिल्हाभरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. येवला हा भुजबळांचा मतदारसंघ असल्याने तेथे आंदोलनाची तीव्रता जास्त होती.
शिवसेनाप्रमुखांची अटक सूडबुद्धीने नव्हती का?
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अटक करण्याची गरज नाही असे राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. पण केवळ तत्कालिन गृहमंत्री भुजबळ यांच्या हट्टापायी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांंना अटक करण्यामागे राजकीय सूडबुद्धी नव्हती काय, असा सवाल भाजपाचे अतुल भातखळकर यांनी विधानसभेत केला. न्यायालयाने ठाकरेंच्या अटकेबाबत सरकारवर ताशेरे ओढले होते, याची आठवण भातखळकर यांनी करून दिली.