‘पद्म’साठी अभिनेत्री चढली १२ मजले!
By Admin | Updated: January 4, 2016 03:31 IST2016-01-04T03:25:05+5:302016-01-04T03:31:04+5:30
पद्मश्री, पद्मभूषण यासारख्या राष्ट्रीय सन्मानासाठी आपल्या नावाची नेत्यांनी शिफारस करावी म्हणून विविध क्षेत्रातील नामवंतांकडून प्रयत्न केले जातात. मन राखायचे म्हणून नेतेही शिफारसपत्र देऊन टाकतात

‘पद्म’साठी अभिनेत्री चढली १२ मजले!
नागपूर/ मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण यासारख्या राष्ट्रीय सन्मानासाठी आपल्या नावाची नेत्यांनी शिफारस करावी म्हणून विविध क्षेत्रातील नामवंतांकडून प्रयत्न केले जातात. मन राखायचे म्हणून नेतेही शिफारसपत्र देऊन टाकतात, हे पद्म पुरस्कारामागचे ‘वास्तव’ सांगताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात थेट ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांच्या नावाचा उल्लेख केला.
पद्मभूषण मागण्यासाठी आशा पारेख १२ मजले चढून माझ्या घरी आल्या होत्या, असे त्यांनी सांगितले. पद्म किताबासाठी शिफारसपत्र देऊन देऊन अक्षरश: वीट आला असल्याचेही ते म्हणाले. शनिवारी नागपुरात सेवासदनाच्या नागपूर शाखेतर्फे शिक्षण-प्रबोधन पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या वेळी गडकरी बोलत होते. कोणत्याही पुरस्कारासाठी जाहिरात दिली जाऊ नये, असे सांगत पुणे सेवासदन सोसायटीनेही पुढील वर्षी या पुरस्कारासाठी जाहिरात देऊन अर्ज न मागवता समाजातील चांगल्या माणसांच्या मदतीने उत्तम काम करणाऱ्या संस्थेची पुरस्कारासाठी निवड करावी, अशी सूचना गडकरींनी केली.
पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारासाठी अनेक नामवंत आपल्या नावाची शिफारस करावी म्हणून नेत्यांकडे येतात. अनेकदा नेतेही मन राखायचे म्हणून शिफारसपत्र देतात. मला मात्र असे शिफारसपत्र देऊन देऊन अक्षरश: वीट आला आहे, असे गडकरी म्हणाले. पुरस्कारासाठी नामवंत कसे धडपड करतात, याबाबत त्यांनी आशा पारेख यांच्याबाबतचा किस्सा सांगितला.
आशा पारेख यांना पद्मश्री मिळाला आहे. आता पद्मभूषण मिळावा म्हणून त्या मुंबईतल्या माझ्या घरी आल्या होत्या. त्या दिवशी लिफ्ट बंद होती. त्या १२ मजले चढून वर आल्या आणि मला भेटल्या. पद्मभूषण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी गळ त्यांनी घातली, असे गडकरींनी सांगितले.
गडकरींचा दावा निरर्थक आहे. मी कधीही ‘पद्म’ मागण्यासाठी त्यांच्याकडे गेले नाही. मला यावर आणखी काहीही बोलायचे नाही, अशी प्रतिक्रिया खुद्द आशा पारेख यांनी दिली.