Actor Salman Khan's claim is false | अभिनेता सलमान खानचा दावा खोटा
अभिनेता सलमान खानचा दावा खोटा

मुंबई : ज्या वेळी अपघात झाला तेव्हा मी गाडी चालवत नव्हतो, मी मद्यपान केले नव्हते, हा अभिनेता सलमान खानचा दावा खोटा असल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी बुधवारी सत्र न्यायालयात केला़
या घटनेला आता १३ वर्षे उलटली आहेत़ याआधी या खटल्याची सुनावणी वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुरू होती़ सत्र न्यायालयात याची सुनावणी सुरू होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे़ असे असताना याआधी कधीही सलमनाने मी गाडी चालवत नव्हतो, असा दावा केला नाही़ घटना घडली तेव्हा अशोक सिंग गाडी चालवत होता, हे सिद्ध करण्यासाठी बचाव पक्षाने स्वतंत्र साक्षीदार तपासला नाही़ उलट स्वत: साक्षीदार म्हणून साक्ष देणार का, हा न्यायालयाचा प्रस्तावदेखील सलमानने नाकारला़ कारण साक्ष दिल्यानंतर त्याची उलट तपासणी झाली असती व त्याचे पितळ उघडे पडले असते, असा युक्तिवाद अ‍ॅड़ घरत यांनी केला़ महत्त्वाचे म्हणजे गाडीचा टायर फुटल्याने अपघात झाल्याचे सलमानचे म्हणणे साफ खोटे आहे़ सलमानची गाडी अत्याधुनिक आहे़ गाडीत बिघाड झाल्यास त्याची सूचना तत्काळ चालकाला मिळते़ त्यामुळे सलमानचे हेही म्हणणे चुकीचे आहे़
तसेच दिवंगत पोलीस हवालदार रवींद्र पाटील हा अपघात झाला, त्या वेळी झोपला होता, असा दावा करून सलमान न्यायालयाची दिशाभूल करीत आहे़ पाटील यानेच या घटनेची तक्रार नोंदवली असल्याने तो झोपला होता, हा सलमानचा दावा खोटा आहे, असेही अ‍ॅड़ घरत यांनी न्यायालयाला सांगितले़ येत्या ६ एप्रिला अ‍ॅड़ घरत पुढील युक्तिवाद करतील़ वांद्रे येथे २००२ मध्ये घडलेल्या घटनेत एकाचा बळी गेला आहे़
याप्रकरणी सलमानविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू आहे़ यात दोषी आढळल्यास सलमानला १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ
शकते़ (प्रतिनिधी)

Web Title: Actor Salman Khan's claim is false

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.