अभिनेते अजय वढावकर यांचे निधन
By Admin | Updated: February 28, 2015 04:53 IST2015-02-28T04:53:29+5:302015-02-28T04:53:29+5:30
दूरदर्शनच्या ‘नुक्कड’ मालिकेतील गणपत हवालदाराच्या भूमिकेद्वारे घराघरांत पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते अजय वढावकर (५९) यांचे पुण्यात शुक्रवारी निधन झाले.

अभिनेते अजय वढावकर यांचे निधन
पुणे : दूरदर्शनच्या ‘नुक्कड’ मालिकेतील गणपत हवालदाराच्या भूमिकेद्वारे घराघरांत पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते अजय वढावकर (५९) यांचे पुण्यात शुक्रवारी निधन झाले. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून ते कर्करोग आणि मधुमेहाने ग्रस्त होते. कर्करोग बळावल्याने त्यांना एक महिन्यापूर्वी वारजे येथील इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, तिथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी आहे.
वढावकर यांनी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. ‘यस बॉस’, ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’, ‘इंग्लिश बाबू देसी मेम’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. कर्करोग आणि मधुमेह या आजारांमुळे त्यांना कलाक्षेत्रातून सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्या पायाला दुखापत झाली होती, त्यामुळे त्यांना एक पाय गमवावाही लागला होता. कांदिवलीतील एका भाड्याच्या घरात ते वास्तव्यास होते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. उपचारासाठी पैसेदेखील नव्हते. त्या वेळी विनोदी कलाकार जॉनी लिव्हर यांनी त्यांना आर्थिक मदत केली होती. दूरचित्रवाहिनीवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाचे दर्शन नुकतेच प्रेक्षकांना घडले होते. वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या ‘नटसम्राट’ नाटकात त्यांनी ‘बुटपॉलिश’ करणाऱ्या पोराची भूमिका अजरामर केली होती. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, हा चटका लावणारा योगायोग! केवळ परिस्थितीशीच नव्हे, तर कर्करोगाशी झुंज देणाऱ्या लढवय्याची अखेर झाली, अशा शब्दांत चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात आली. मराठी व्यावसायिक नाट्यनिर्माता संघातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. (प्रतिनिधी)